देशात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाविरोधात नागरिकांनी मतदान केले आहे. त्यामुळे भाजपाला २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत अवघ्या १५० जागा मिळतील, अशी भविष्यवाणी स्वामी अग्निवेश यांनी केली आहे. त्याचबरोबर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना खुल्या चर्चेचे आव्हान दिले आहे. हिंदू धर्म धोक्यात असल्याचे भासवून काही जण मतांचे ध्रुवीकरण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असता माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भाजपाबाबत आपली भूमिका मांडली.

स्वामी अग्निवेश म्हणाले की, केंद्रातील सरकार विरोधात सर्व सामान्य नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष पाहण्यास मिळत आहे. त्याचा परिणाम देशातील काही भागात भाजपाविरोधात मतदान झाल्याने तिथे त्यांना पराभवला सामोरे जावे लागले आहे. ज्या भाजपाने २०१४ च्या निवडणुकीत बहुमताचा आकडा पार केला होता. त्यांना बहुमताच्या निम्या संख्येजवळ जाणे देखील कठीण होणार असल्याचे त्यांनी म्हटले.

हिंदू धर्म धोक्यात असल्याचे भासवून काही लोक मतांचे ध्रुवीकरण करत आहेत. हिंदू धर्म हा धोक्यात नसून त्याची योग्यरित्या चिकित्सा होणे गरजेचे आहे. यासाठीच मी मोहन भागवतांना खुल्या चर्चेचे आव्हान करतो, असे ते म्हणाले.