वानवडी येथील एक मोबाईल शॉपी चोरटय़ांनी बनावट चावीने उघडताच अलार्म मोठय़ाने वाजला. त्यामुळे या मोबाईल शॉपीतील सीसीटीव्ही कॅमेरे नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्याने तत्काळ चालू केले. सुरक्षा रक्षक आणि पोलिसांना न कळविता स्वत: शॉपीत कोण शिरले हा पाहत बसला.. दहा मिनीटातच चोरटय़ांनी मोबाईल शॉपी रिकामी करीत आठ लाख रुपयांचे मोबाईल व टॅबलेट चोरून नेले. वानवडीतील रिलायन्स डिजिटल एक्सप्रेस मिनी मोबाईल शॉपीत शनिवारी मध्यरात्री हा सर्व प्रकार घडला.
याबाबत मोबाईल शॉपीचे अधिकारी प्रभातकुमार सिंग (वय २४, रा. कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडीतील जगताप चौकात रिलायन्स डिजिटल एक्सप्रेस मिनी मोबाईल शॉपी आहे. शनिवारी रात्री ही मोबाईल शॉपी बंद करून सगळे गेले होते. या ठिकाणी एक सुरक्षा रक्षक असून तो सुद्धा त्या ठिकाणी नव्हता. चोरटय़ांनी हा मोका साधून मध्यरात्री बनावट चावीने मोबाईल शॉपी उघडली. पण, ती उघडताच मोठय़ाने अलार्म वाजला. मोबाईल शॉपीपासून काही अंतरावर त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा नियंत्रण कक्ष आहे. त्या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्याने अलार्म वाजल्यामुळे रात्री बंद केलेले सीसीटीव्ही सुरू केले. शॉपीमध्ये कोण आले हे पहात बसला. त्याला चोरटे आतमध्ये मोबाईल व टॅबलेट चोरी करीत असल्याचे दिसले. त्यानंतर तो मोबाईल शॉपीकडे असलेल्या सुरक्षरक्षाकाला सांगण्यासाठी जाईपर्यंत दहा मिनिटात चोरटय़ांनी शॉपीतील विविध कंपन्यांचे ३६ मोबाईल, २० टॅबलेट, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे रेकॉर्डिग करणारा डीव्हीआर असा एकूण आठ लाख सात हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. सीसीटीव्हीमध्ये आरोपीचे पाठीमागून चित्रीकरण झाले आहे. या अधिकाऱ्याने अलार्म वाजल्यानंतर तत्काळ सुरक्षारक्षकाला संपर्क साधण्याऐवजी सीसीटीव्हीत आरोपींना पाहत बसल्यामुळे उशीर झाला. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक डी. एन. ढोले हे अधिक तपास करीत आहेत.