क्षमतावृद्धीसाठी चार अभ्यासक्रमांची निर्मिती

पुणे : देशभरातील तंत्रशिक्षण महाविद्यालयातील प्राध्यापकांना क्षमतावृद्धीसाठी राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेकडून (एफटीआयआय) धडे दिले जाणार आहेत. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) अटल (एआयसीटीई ट्रेनिंग अँड लर्निग) या कार्यक्रमासाठी एफटीआयआयने चार अभ्यासक्रम विकसित के ले असून, मे ते ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या सत्रांमध्ये प्राध्यापकांचे प्रशिक्षण वर्ग घेतले जाणार आहेत.

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या अटल कार्यक्रमांचे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठीचे वेळापत्रक नुकतेच जाहीर केले. एआयसीटीईकडून अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषधनिर्माण या तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या प्राध्यापकांसाठी क्षमतावृद्धी कार्यक्रम होणार आहेत. एफटीआयआयच्या अ‍ॅनिमेशन फिल्म मेकिंगमध्ये प्राथमिक आणि प्रगत, स्मार्टफोन जर्नलिझममध्ये प्राथमिक व प्रगत हे अभ्यासक्रम त्यात प्राध्यापकांना शिकवले जाणार आहेत. प्रा. संदीप शहारे या अभ्यासक्रमांसाठी मार्गदर्शन करणार आहेत.

एफटीआयआयचे संचालक भूपेंद्र कँथोला म्हणाले, की एआयसीटीईच्या क्षमतावृद्धी कार्यक्रमात ऑगमेंटेड आणि व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीसह विविध घटकांचा समावेश आहे. एफटीआयआयने एआयसीटीईसाठी या पूर्वी एक अभ्यासक्रम विकसित केला होता. आता त्या पुढे चार अभ्यासक्रम राबवले जाणार आहेत. या अंतर्गत शिक्षकांना अ‍ॅनिमेशन शिकवले जाईल. तसेच संशोधन, प्रयोग, प्रकल्पांचे दस्तावेजीकरण करण्यासाठी स्मार्टफोन जर्नलिझमचा वापर करता येईल. एकूण चार सत्रांमध्ये हे अभ्यासक्रम राबवले जातील.