चालू बाजार मूल्यतक्ता (रेडीरेकनर) दर कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी सांगितले. बांधकाम व्यावसायिकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी महसूल विभागाचे अधिकारी आणि बांधकाम व्यावसायिक यांची स्वतंत्र बैठक घेण्याची ग्वाही देखील त्यांनी दिली.

पुण्यात एका संस्थेच्या कार्यक्रमात बोलताना महसूलमंत्री थोरात यांनी रेडीरेकनरवर भाष्य केले. गेल्या दोन वर्षांपासून रेडीरेकनरचे दर वाढलेले नाहीत. त्यामुळे यंदा हे दर वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर थोरात यांनी दर कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

दरम्यान, पुण्यात मूलभूत सुविधा उपलब्ध असल्यामुळे देशातील सर्व भागातील आणि क्षेत्रातील व्यक्तींच्या आकर्षणाचे शहर पुणे आहे. पुण्यातील बांधकामांची संख्या वाढत असून दर्जेदार बांधकामे करण्याचे श्रेय बांधकाम व्यावसायिकांचे आहे. गौण खनिज उत्खनन, मुद्रांक शुल्क तसेच बांधकाम व्यावसायिकांचे अन्य प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी महसूल विभागाचे अधिकारी व बांधकाम व्यावसायिकांची स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असेही थोरात यांनी सांगितले.