दिल्ली, सिकंदराबादमध्ये गुन्हे शाखेची कारवाई

पुणे : लष्कर भरती परीक्षा प्रश्नपत्रिका फुटल्याच्या प्रकरणात लेफ्टनंट कर्नल दर्जाचा अधिकारी सामील असल्याचे तपासात उघड झाले. गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने लष्करी अधिकाऱ्यासह दोघांना अटक केली. प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर देशभरातील लष्कर भरती परीक्षा रद्द करण्यात आली होती.

या प्रकरणी लेफ्टनंट कर्नल भगतप्रीतसिंग बेदी आणि वीरप्रसाद यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात यापूर्वी सात जणांना अटक करण्यात आली होती. वानवडी अणि विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते.

या प्रकरणात किशोर महादेव गिरी (रा. माळेगाव, बारामती), माधव शेषराव गित्ते (रा. विश्रांतवाडी), गोपाळ कोळी (दिघी), उदय औटी (खडकी) यांना अटक करून त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली होती. औटी आणि कोळी हे लष्करात शिपाई आहेत.

चौकशीत तमिळनाडूतील लष्करी अधिकारी थिरू मुरूगन याने समाजमाध्यमाचा वापर करून प्रश्नपत्रिका फोडल्याचे उघड झाले होते. दिल्लीतील लष्करी अधिकारी वसंत किल्लारी याने प्रश्नपत्रिका आरोपींना समाजमाध्यमावरून पाठविल्याचे निष्पन्न झाले होते. किल्लारी आणि मुरूगन यांनाही अटक करण्यात आली होती. तपासात सिकंदराबाद येथील भरती प्रकिया प्रमुख आधिकारी भगतप्रीतसिंग बेदी या प्रकरणात सामील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर गुन्हे शाखेने बेदी यांना सिकंदराबाद येथून अटक केली. वीरप्रसाद याला दिल्लीतून अटक करण्यात आली. या प्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.