डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समानता हवी होती. मात्र, जाती व्यवस्था वाढतच असून, पोटजातींमध्येही वाद होत आहेत. डॉ. आंबेडकरांच्या विचारावर श्रद्धा नसेल, तर त्यांचा जयजयकार करून उपयोग नाही, असे मत गुजरातमधील दलित चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते मार्टिन माकवान यांनी व्यक्त केले. ब्राह्मण, क्षत्रिय समाज दलितांचा शत्रू नाही, तर मनातील भीती हा खरा शत्रू आहे, असेही ते म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दलित अत्याचार विरोधी परिषदेत ते बोलत होते. अविनाश महातेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेला मंगला खिवंसरा, डॉ. मिलिंद आवाड, प्रियदर्शी तेलंग, परशुराम वाडेकर, डॉ. नितीन नवसागरे आदी उपस्थित होते.
मकवाना म्हणाले की, ब्राह्मण, क्षत्रिय समाज नव्हे, तर मनातील भीती ही दलितांचा शत्रू आहे. ही भीती डोक्यातून जात नाही तोवर दलित शक्ती बाहेर येणार नाही. देशाचा उद्धार हा दलित शक्तीच्या माध्यमातूनच होऊ शकतो.
महातेकर म्हणाले की, दलितांवर अत्याचार होणाऱ्या ठिकाणी जाऊन अत्याचार विरोधी परिषदांचे आयोजन करायला हवे. एखादा अत्याचार झाल्यानंतर प्रतिक्रिया देण्यापेक्षा इतर वेळेला आपण काय भूमिका घेतो या गोष्टीला महत्त्व आहे. राज्यामध्ये दलित अत्याचार विरोधी कायद्यानुसार शिक्षा होण्याचे प्रमाण कमी आहे.
खिवंसरा म्हणाल्या की, गावकुसाबाहेरची माणसे बोलायला व विरोध करायला लागली म्हणून अत्याचार वाढले आहेत. अत्याचार सहन करणे हा देखील गुन्हाच आहे. दलितांची वाढती पत पाहून तिरस्कार केला जात आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाडेकर यांनी केले. दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले.