विवाहाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या एकास विशेष न्यायाधीश के. के. जहागीरदार यांनी दहा वर्ष सक्तमजुरी तसेच वीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

गणेश सखाराम कदम (वय २७, रा. तळवडे, मूळ रा. बीड) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात बलात्कार, अपहरण आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कलमान्वये चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडीत मुलीच्या वडिलांनी याबाबत फिर्याद दिली होती. २१ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी पावणेबाराच्या सुमारास तळवडे परिसरातून कदम याने मुलीला विवाहाचे आमिष दाखवून पळवून नेले होते. कदम याने तिला पंढरपूर आणि शिर्डी येथे नेले हाेते. तिथे भाडेतत्वावर घेतलेल्या खोलीत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी आरोपी कदमला पाटोदा बस थांब्यावरून ताब्यात घेतले. पोलिस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपी कदमच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात सरकार पक्षाकडून विशेष सरकारी वकील ॲड.अरुंधती ब्रह्मे यांनी काम पाहिले. सरकार पक्षाकडून सहा साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली होती. . चिखली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक निलेश दरेकर यांनी न्यायालयीन कामकाजात सहाय केले. साक्ष तसेच पुरावे ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपीला दहा वर्ष सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली.