पुणे : पुण्यातील डॉक्टरांच्या पथकाने परदेशी महिलेच्या अधिवृक्क ग्रंथीतून सुमारे २३ सेंटिमीटर आकाराची गाठ यशस्वीरीत्या काढल्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, खुली शस्त्रक्रिया न करता थ्रीडी लॅप्रोस्कोपिक पद्धतीने ही गाठ काढण्यात आली.

नायजेरियातील ५८ वर्षीय महिलेला अनेक वर्षांपासून पाठदुखी आणि उलट्यांचा त्रास होत होता. तिच्या तपासणीमध्ये साधारणत: १५ सेंटिमीटरची गाठ अधिवृक्क ग्रंथीच्या डाव्या बाजूस दिसून आली. स्थानिक डॉक्टरांनी तिला लवकरात लवकर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. शस्त्रक्रियेच्या भीतीने तिने पुढील उपचार टाळले होते. मात्र, त्रास कमी न झाल्यामुळे शेवटी तिने भारतात वैद्यकीय उपचार घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ती पुण्यातील एस हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. महिलेच्या पुन्हा केलेल्या तपासणीत अधिवृक्क ग्रंथीतील गाठ २३ सेंटिमीटरपर्यंत वाढलेली दिसून आली.

आणखी वाचा-Pune Accident Case : अल्पवयीनाच्या आजोबाची गुन्हे शाखेकडून चौकशी

महिलेच्या पोटामध्ये जवळजवळ अर्ध्याहून अधिक भाग गाठीने व्यापला होता. ही गाठ डाव्या भागात असल्यामुळे डावे मूत्रपिंड, प्लीहा व स्वादुपिंड आणि मोठे आतडे यांना घट्ट चिकटून बसली होती. डॉक्टरांनी थ्रीडी लॅप्रोस्कोपी या आधुनिक दुर्बिणीच्या तंत्राने ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. त्यासाठी साडेचार तास वेळ लागला. आजूबाजूचे सर्व अवयव बाजूला करून अधिवृक्काला कोणताही धक्का न लावता गाठ काढण्यात यश आले. या गाठीतूनच तीन लिटर द्रवपदार्थही काढण्यात आले. या शस्त्रक्रियेनंतर चार दिवसांत महिलेला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. शस्त्रक्रिया करणाऱ्या मूत्रविकार तज्ज्ञांमध्ये प्रा. डॉ. सुरेश पाटणकर, डॉ. गुरुराज पडसलगी, डॉ. मयूर नारखेडे व डॉ. काशिनाथ ठाकरे यांचा समावेश होता.

आतापर्यंत भारतामध्ये २० सेंटिमीटर आकाराची गाठ दुर्बिणीने काढण्यात आली होती. जगामध्ये आतापर्यंत २२ सेंटिमीटरपर्यंत गाठ काढल्याची नोंद आहे. आम्ही थ्रीडी लॅप्रोस्कोपीद्वारे काढलेल्या या २३ सेंटिमीटर आकाराच्या गाठीची नोंद आतापर्यंत काढलेली सर्वांत मोठी गाठ अशी झाली आहे. -प्रा. डॉ. सुरेश पाटणकर, अध्यक्ष, एस हॉस्पिटल

आणखी वाचा-थरार! मनोरुग्ण पुणे रेल्वे स्थानकाच्या छतावर चढतो तेव्हा…

अधिवृक्क ग्रंथीचा दुर्मीळ आजार

मानवाच्या शरीरामध्ये साधारणत: चार ते आठ ग्रॅम या वजनाची अधिवृक्क ग्रंथी दोन्ही मूत्रपिंडाच्या डोक्यावरती असते. या ग्रंथीला शरीराच्या कार्यक्षमतेमध्ये फारच महत्त्वाचे स्थान आहे. ॲड्रिनलिन व स्टेरॉइड ही अत्यंत जीवनावश्यक अशी संप्रेरके या ग्रंथीमध्ये तयार होतात. अधिवृक्क ग्रंथीमध्ये अनेक प्रकारचे आजार निर्माण होऊ शकतात. त्यात पाण्याच्या बुडबुड्यासारखी गाठ हा एक दुर्मीळ प्रकारचा आजार आहे.