पुणे : पाऊस भाकितांना खोटे ठरवत यंदा जून महिन्याचा पंधरवडा उन्हाने गाजविला, वटपौर्णिमेचा चंद्रही यंदा लख्ख-लख्ख आभाळात दर्शन देऊन गेला. पण या सर्व काळात हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार पाऊस जोमाने सरकत होता. या ‘अदृश्य’ नैर्ऋत्य मोसमी पावसाने विदर्भासह महाराष्ट्रातील ९९ टक्के भाग व्यापला असल्याचे हवामान खात्याचे ताजे तपशील आहेत.

 मोसमी पावसाने १० जूनला तळकोकणातून महाराष्ट्रात प्रवेश केला. बहुतांश वेळेला प्रतिकूल स्थितीतही त्याने पाच दिवसांचा प्रवास करून गुरुवारी महाराष्ट्राच्या बहुतांश भाग व्यापला आहे. मात्र, मोसमी पाऊस दाखल होऊनही तो बरसत नसल्याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मोसमी पाऊस महाराष्ट्रात दाखल झाल्याच्या कालावधीपासून अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे मोसमी पाऊस दाखल झालेल्या भागात या कालावधीत मोठा पाऊस झालेला नाही. जूनच्या पहिल्या पंधरवडय़ात राज्यात सरासरीच्या तुलनेत ५६ टक्के पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या आणि राज्यातील पाणीसाठय़ाबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. 

जून महिन्यामध्ये राज्यात पावसाचा टक्का कमी राहणार असल्याचे पूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, सध्या काही भागांत एकदमच पाऊस गायब असल्याने चिंता आहे. मात्र, १९ जूनपासून काही भागांत हळूहळू पाऊस जोर धरणार आहे. अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर द्रोणीय स्थिती, तर गुजरातपासून मध्य महाराष्ट्रापर्यंत चक्रिय वारे निर्माण होणार असल्याने समुद्रातून बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेग काही प्रमाणात वाढून पावसाला पोषक वातावरण तयार होणार आहे.

थोडीशीच रिपरिप का?

हवामानशास्त्राच्या निकषांनुसार मोसमी पाऊस महाराष्ट्रभर पोहोचला असला, तरी समुद्रातून बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेग कमी असल्याने पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली असतानाच पावसाच्या आगमनाबाबत संकेत मिळू लागले आहेत.

हळूहळू जोर..

येत्या रविवारपासून (१९ जून) दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काही भागांत पाऊस हळूहळू जोर धरणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येत्या पाच दिवसांत काय?

  • अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेग काही प्रमाणात वाढणार असल्याने १९ जूनपासून प्रामुख्याने दक्षिण कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
  • सिंधुदुर्ग, रत्नागिरीत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड, पालघर, ठाणे, मुंबई आदी भागातही २६ जूनपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता आहे.
  • पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे आदी जिल्ह्यांच्या घाट विभागातही पाऊस जोर धरण्याचा अंदाज आहे.
  • पुढील पाच दिवस विदर्भ आणि मराठवाडय़ातही काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.