कसबा पोटनिवडणुकीचा निकाल लागला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला आहे. भाजपा उमेदवार हेमंत रासने यांच्यांशी झालेल्या चुरशीच्या लढतीत धंगेकरांनी बाजी मारली. दुसरीकडे, या निवडणुकीत बिग बॉस फेम अभिनेते अभिजीत बिचुकले यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता.

या निवडणुकीत बिचुकले यांना केवळ ४७ मतं मिळाली आहेत. येथील मतदारांनी बिचुकले यांच्यापेक्षा जास्त ‘नोटा’ला (NOTA) मतदान केलं आहे. या निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर अपक्ष उमेदवार बिचुकले यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “मी पुण्यात राहत नाही. मी पुण्याचा नाहीये, मी सांगलीचा आहे,” अशी प्रतिक्रिया बिचुकले यांनी दिली. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.

हेही वाचा- “आता प्रत्येक बालेकिल्ला…”, कसब्यातील विजयानंतर संजय राऊतांचं फडणवीसांना आव्हान

या निवडणुकीत जनतेनं जे प्रेम दाखवलं ते मतांमध्ये का उतरलं नाही? असा प्रश्न विचारला असता अभिजीत बिचुकले म्हणाले, “तो जनतेचा प्रश्न आहे. तो माझा प्रश्न नाही. मला मत का नाही दिलं? असं आम्ही जनतेला जाऊन विचारू शकत नाही. राजेशाही असती तर त्यांना दाखवलं असतं. भारतात लोकशाही आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जसं सांगितलं आहे, तसं जगायला हवं.”

हेही वाचा- संजय राऊतांच्या ‘चोरमंडळ’ विधानावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोक सेल्फी काढतात, पण मत देत नाहीत, याबाबत विचारलं असता अभिजीत बिचुकले पुढे म्हणाले, “मग मी जनतेला शिव्या देऊ का? लोकशाहीचा मार्ग जिवंत ठेवण्यासाठी मी निवडणूक लढतो. शर्यत असून संपलेली नाही. कारण मी अजून जिंकलो नाही. आता २०२४ विधानसभा निवडणूक हे माझं पुढील मिशन आहे. या निवडणुकीत पूर्ण विधानसभा जिंकून अलंकृता बिचुकले या पहिल्या महिला मुख्यमंत्री असतील.”