scorecardresearch

संजय राऊतांच्या ‘चोरमंडळ’ विधानावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

संजय राऊतांच्या चोरमंडळ विधानावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

uddhav thackeray and sanjay raut
फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अलीकडेच विधीमंडळाचा उल्लेख ‘चोरमंडळ’ असा केला आहे. संजय राऊतांच्या या वक्तव्यामुळे विधानसभेत मोठा गदारोळ झाला आहे. भाजपाच्या अनेक सदस्यांनी संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आणला. विधानसभा अध्यक्षांनीही हा प्रस्ताव मान्य केला आहे.

दरम्यान, विरोधी पक्षानेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी केली. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सत्ताधारी पक्षाने चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. पण विरोधी पक्षाने चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चहापानाच्या बहिष्कारावर प्रतिक्रिया देताना म्हटलं, ‘बरं झालं देशद्रोह्यांबरोबर चहा पिणं टळलं.’ मुख्यमंत्र्यांच्या याच विधानावर विरोधकांनी आक्षेप घेतला असून हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा- VIDEO: “तुम्ही गद्दार आहात, एका डाकूबरोबर…”, बच्चू कडूंची गाडी आडवून वयोवृद्धाने झापलं

या सर्व घडामोडीनंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांच्या ‘चोरमंडळ’ विधानाबाबत विचारलं असता उद्धव ठाकरे म्हणाले, “पुढील एक-दोन दिवसात संजय राऊत मुंबईत परत येणार आहेत. ते मुंबईत आल्यानंतर मी त्यांच्याशी चर्चा करेन की, तुम्ही नक्की काय बोलले होते. त्यानंतर मी माझी भूमिका मांडेन,” अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

हेही वाचा- “ठाकरे हे आडनाव फक्त…”, उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला संजय गायकवाडांचं प्रत्युत्तर

यावेळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधीपक्षाला देशद्रोही म्हटलं नव्हतं तर मग ते कोणाला देशद्रोही म्हणाले होते? ते कुणाबरोबर चहापान करणार होते? ‘चाय पे चर्चा’ कुणाबरोबर होणार होती? मग त्यांनी चहासाठी देशद्रोह्यांना आमंत्रित केलं होतं का? या सर्व प्रश्नांचाही खुलासा व्हायला हवा. त्यांच्या नजरेत नेमकं देशद्रोही कोण आहे? विरोधी पक्ष देशद्रोही नसेल तर मग ते कुणाबरोबर चहा पिणार होते? त्यांनी चहापानासाठी कुणाला आमंत्रित केलं होतं?” असे सवाल उद्धव ठाकरेंनी सत्ताधारी पक्षाला विचारले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-03-2023 at 15:15 IST