पुणे : अल्पवयीन मुलीवर रेल्वे सुरक्षा दलातील (रेल्वे प्रोटेक्शन फोर्स) हवालदाराने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर लोहमार्ग पोलिसांकडून सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. याप्रकरणात लोहमार्ग पोलिसांनी मंगळवारी एका महिलेसह दोघांना अटक केली. हवालदाराने रेल्वेच्या जागेत बेकायदा सिद्धार्थ मल्टिपर्पज संस्था सुरू केल्याचे उघडकीस आले आहे. या संस्थेत हवालदाराने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. हवालदाराने साथीदारांच्या मदतीने रेल्वे स्थानकावर पळून आलेल्या आणखी काही मुलींवर अत्याचार केल्याचा संशय असून, या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे.
लोहमार्ग पोलिसांनी मंगळवारी या प्रकरणात सुश्मिता कसबे आणि करण राठोड यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना १२ नाेव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, अशी माहिती लोहमार्ग पोलीस दलाचे अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.यापूर्वी या प्रकरणात कमलेश तिवारी (मूळ रा. उत्तर प्रदेश ) याला अटक करण्यात आली होती. याप्रकरणी रेल्वे सुरक्षा दलातील (आरपीएफ) हवालदार अनिल पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवार पसार झाला असून, त्याचा लोहमार्ग पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.
हेही वाचा >>>पुणे शहरात साखळी बॉम्बस्फोटाचा कट; दहशतवाद्यांना सीरियातून सूचना
याबाबत एका अल्पवयीन मुलीने पुणे रेल्वे स्थानक लोहमार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित अल्पवयीन मुलगी दहावीत शिकत होती. तिचे एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. दोघे जण मूळचे छत्तीसगडमधील असून, तेथून पसार झाले. त्यानंतर मुलीच्या पालकांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार छत्तीसगडमधील स्थानिक पोलीस ठाण्यात दिली होती.
छत्तीसगडमधील स्थानिक पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या प्रियकराविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, गेल्या महिन्यात मुलगी आणि तिचा मित्र पुणे रेल्वे स्थानकात सापडले. आरोपी हवालदार पवार याने ताडीवाला रस्त्यावरील रेल्वेच्या जागेत सिद्धार्थ मल्टिपर्पज संस्था सुरू केली. ही संस्था बेकायदा सुरू करण्यात आली होती. या संस्थेला परवागनी देण्यात आली नसल्याचे तपासात उघडकीस आले. रेल्वे स्थानकात पळून आलेल्या परगावाच्या मुलींना हेरुन हवालदार पवार आणि त्याचे साथीदार सिद्धार्थ मल्टिपर्पज सोसायटीत घेऊन जायचे. तेथे त्यांना धमकावून पैसे उकळले जायचे. अल्पवयीन मुले ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यांची माहिती बाल न्याय मंडळाला द्यावी लागते. पवार परस्पर पळून आलेल्या मुलांना या संस्थेत डांबून ठेवायचा, असे तपासात उघडकीस आले आहे.पवार याने संस्थेत काहीजणांना कामावर ठेवले होते. पुणे रेल्वे स्थानकात पळून आलेल्या मुलींना हेरण्यासाठी कामगारांना काम दिले होते. त्यांना तो दरमहा पैसे द्यायचा. पसार झालेल्या पवारला निलंबित करण्यात आले असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे.
हेही वाचा >>>फटाके सोडाच, अगरबत्तीही जाळू नका! पुण्यात वायू प्रदूषण वाढलं; आरोग्य विभागाने दिले ‘१३’ महत्त्वाचे सल्ले
रेल्वेच्या जागेत आरपीएफमधील हवालदार अनिल पवारने बेकायदा संस्था सुरू केली. रेल्वे प्रशासनाला याबाबतची माहिती होती की नाही, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. रेल्वे स्थानकात पळून आलेल्या अल्पवयीन मुलींना डांबून पवारने आणखी काही मुलींवर अत्याचार केल्याचा संशय आहे. पीडित मुलगी, तसेच कुटुंबीयांनी लोहमार्ग पोलीस अधीक्षक कार्यालय (संगम पूल)येथे तक्रार करावी.- श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक, लोहमार्ग पोलीस पुणे विभाग
बेकायदा संस्थेची मनसेकडून तोडफोड
रेल्वेच्या जागेतील सिद्धार्थ मल्टीपर्पज सोसायटीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी संस्थेतील कार्यालयाची मंगळवारी दुपारी तोडफोड केली. मनसेचे नेते वसंत मोरे आणि कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी सिद्धार्थ मल्टीपर्पज सोसायटीच्या आवारात शिरून तोडफोड केली. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी मोरे यांनी यावेळी केली.