बारामती: पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून मदत मिळण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून मदतीसाठी तयारी करण्यात आली असूून लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल,’ असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. बारामती येथे आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना पवार यांनी लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

पवार म्हणाले, ‘शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. केंद्र सरकारकडून मदत मिळावी, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे राज्याच्या दौऱ्यावर आले असताना मी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मागणीचे पत्र दिले आहे. त्यामुळे योग्य वेळी निर्णय घेतला जाणार आहे.‘

‘राज्यात पावसाने आहाकार माजवला असल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पूर आला आहे. आणखी पाच ते सहा दिवसांचा ‘रेडअलर्ट’ देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. अन्न, पाणी, वीज आणि औषधांची सुविधा कमी पडणार नाही. पूर परिस्थितीमुळे उडीद, मका, सोयाबीन, तूर आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत,’