अजित पवारांची स्पष्टोक्ती; ‘काहींनी स्वत:च्या फायद्यासाठी निष्ठा बदलल्या’

पिंपरी महापालिकेत १२८ जागा आहेत, मात्र पक्षाकडे इच्छुकांची संख्या प्रचंड आहे. नव्या-जुन्यांचा विचार करून निर्णय घेतला जाईल. काहीजण कामाला लागा, असे आदेश सांगत सुटले आहेत. मात्र, तसे अजिबात कोणालाही सांगितले नाही, असे स्पष्ट करत उमेदवारी मिळो न मिळो पक्षाचे काम करा आणि  पक्षाची सत्ता पुन्हा आणा, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आकुर्डीत केले.

खंडोबामाळ मंदिरात पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या मेळाव्यात पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, पिंपरी-चिंचवडमध्ये काहीजणांनी स्वत:च्या फायद्यासाठी आपल्या निष्ठा बदलल्या. गोरगरिबांना मिळणाऱ्या योजनांमध्ये खडा टाकण्याचे काम भाजप नेते करतात. महिलांना शिवणयंत्र देण्यास भाजप नगरसेविकेने विरोध केला. भाजप, शिवसेना, मनसेच्या मोठय़ा नेत्यांना पिंपरी-चिंचवड शहराचे काही पडले नाही. शिवसेना, भाजपचा जीव मुंबईतच अडकला आहे. रावसाहेब दानवे काहीही बोलत असतात. मनसे ‘कृष्णकुंज’च्या बाहेर पडेल की नाही अशी अवस्था आहे. अडीच वर्षांत भाजप सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. ‘खोटं बोल पण रेटून बोल’ अशी त्यांची कार्यपद्धती आहे. निवडणुका येताच त्यांना फुले, शाहू, आंबेडकर आठवतात. ‘अच्छे दिन’ येणार अशी आश्वासने त्यांनी दिली. मात्र मोदी, फडणवीस यांनाच ‘अच्छे दिन’ आले आहेत.महापौर शकुंतला धराडे, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. जयदेव गायकवाड, शहर अध्यक्ष विनोद कांबळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे, ज्ञानेश्वर कांबळे, देवा सूर्यवंशी, सूर्यकांत पात्रे उपस्थित होते.

समविचारी पक्षांच्या मतांची विभागणी होऊ नये म्हणून आघाडीसाठी थोडे थांबलो आहोत.

अजित पवार