बारामती : ‘कोरेगाव पार्क परिसरातील चाळीस एकर जागेच्या खरेदी व्यवहारप्रकरणी चौकशी सुरू झाली आहे. पार्थ पवार यांनी याप्रकरणी एक रुपयाचाही व्यवहार केलेला नाही. चौकशीतून वस्तुस्थिती आणि सत्य जनतेसमोर येईल,’ अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी दिली. ‘निवडणुका आल्या की आरोप होतात. माझ्यावरही काही वर्षांपूर्वी साठ ते सत्तर हजार कोटींचा आरोप झाला होता’, असेही त्यांनी सांगितले.
अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ संचालक असलेल्या अमेडिया कंपनीने कोरेगाव पार्क परिसरातील महार वतनाची चाळीस एकर जागा बेकायदा खरेदी केल्याचे प्रकरण पुढे आले आहे. या पार्श्वभूमीवर बारामती येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी या जागा गैरव्यवहारावर प्रतिक्रिया दिली.
‘या संदर्भातील मी स्पष्ट भूमिका यापूर्वीच मांडली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यातून वस्तुस्थिती जनतेसमोर निश्चित येईल. या सर्व प्रकरणात एक रुपयाचाही व्यवहार झालेला नसताना कागद कसा होऊ शकतो, हेच समजत नाही. त्याचा खुलासा एक महिन्यात होईल. चौकशी समितीमध्ये चांगल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माझ्यावरही काही वर्षांपूर्वी साठ ते सत्तर हजार कोटींचा आरोप झाला होता. निवडणुका आल्या की आरोप होतात,’ असे पवार यांनी सांगितले.
ते म्हणाले, ‘पारदर्शक काम केले, की बारामतीतील जमिनींचे कागद काढले जातात. माझ्या नावाचा वापर करून जवळच्या कार्यकर्त्याने किंवा नातेवाईकांनी काही सांगितले, तरी नियमात नसेल, तर ते काम अधिकाऱ्यांनी करू नये. पुरावे असतील, तर चौकशी झाली पाहिजे,’ असे पवार यांनी बारामती जमीन आरोपांबाबत भूमिका मांडली.
दरम्यान, आगामी निवडणुकांबाबतही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ‘बारामती आणि माळेगाव नगरपंचायतीचा कायापालट करून दाखवीन. काम करून घेण्याची जबाबदारी माझी असेल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवारपासून होत आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी पुणे शहर आणि ग्रामीण भागाचा दौरा आणि गुरुवारी बारामती नगराध्यक्ष उमेदावरांच्या मुलाखती घेणार आहे. जेजुरी, सासवड, उरळी देवाची, दौंड, इंदापूर, खेड, आळंदी, तळेगाव दाभाडे, लोणावळा, जुन्नर या निवडणुकांवरही लक्ष आहे.’
‘जय पवार निवडणूक लढविणार नाहीत’
‘जय पवार बारामती नगरपरिषदेची निवडणूक लढविणार नसल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. जयबाबत मी तसे काही ऐकलेले नाही आणि तसे काही होणार नाही,’ असे पवार यांनी सांगितले.
