पुणे : ‘पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये टोळक्यांकडून कोयते उगारून दहशत माजविण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. तोडफोड करणाऱ्या गुंडांचा बंदोबस्त करायला हवा,’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांनी आदेश दिला. पुणे पोलीस आयुक्तालयातील विविध विकासकामांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात झाले. त्या वेळी बोलताना पवार यांनी ही सूचना केली.
ते म्हणाले, ‘पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराचा विस्तार होत आहे. कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून महत्त्वाची भूमिका पार पाडली जात आहे. कायदा-सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे. त्यासाठी आम्हीही सातत्याने प्रयत्नशील असून, जिल्हा वार्षिक योजनेला मंजूर केलेल्या २२ हजार कोटी रुपयांतील पाच टक्के रक्कम ही पोलीस दलासाठी राखीव ठेवली आहे. आतापर्यंत पुणे जिल्हा नियोजन समितीने ४० कोटी रुपये पोलीस दलाला दिले आहेत. त्यामुळे पाेलीस ठाण्यात दाखल होण्याऱ्या प्रत्येकाच्या तक्रारीचे निराकरण केले पाहिजे.’
उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, अप्पर मुख्य सचिव इक्बालसिंह चहल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, अर्चना त्यागी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा या वेळी उपस्थित होते.
‘राज्य शासनाने गेल्या दीड वर्षात पुणे पोलीस दलास एक हजार कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्या माध्यमातून सीसीटीव्ही यंत्रणा, बोपदेव घाटासह टेकड्यांवर वाढवलेली सुरक्षा, गस्त घालण्यासाठी आधुनिक व्हॅन, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे पोलीस दलाच्या कार्यपद्धतीत सुधारणा झाली आहे. बोपदेव घाटासह शहरातील निर्जन ठिकाणे, टेकड्यांवरील सुरक्षेसाठी ८० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पुणे पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध आहे,’ असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
‘सांगूनही कामे होत नाहीत’
बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीसाठी निधी मंजूर झाला आहे. मात्र, प्रशासकीय कागदोपत्री अडचणींमुळे बंडगार्डन पोलीस ठाणे स्थलांतरित झाले नाही. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचे अपर मुख्य सचिव इक्बालसिंह चहल यांना व्यासपीठावरच बोल सुनावले. ‘मुख्यमंत्री, पोलीस महासंचालकांनी सांगूनही बंडगार्डन पोलीस ठाणे स्थलांतरित झाले नाही. आम्ही तुम्हाला सार्वजनिक कामे सांगतो. मात्र, सांगूनही कामे होत नाहीत,’ अशा शब्दांत पवार यांनी नाराजी व्यक्त केली.