पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. महायुतीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून राज्यात विविध ठिकाणच्या दौऱ्यात पक्ष प्रवेश, मेळावे घेतले जात आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे दौऱ्यात ‘जनसंवाद’ यात्रेच्या माध्यमातून खडकवासला विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत विविध विषयांवर भाष्य केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीबाबत जिल्हास्तरावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. त्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, ‘या निवडणुका स्थानिक प्रश्नांवर लढायला हव्यात. प्रत्येक जिल्ह्याची राजकीय परिस्थिती वेगवेगळी असते. त्या त्या ठिकाणच्या राजकीय परिस्थिनुसार त्या भागातील स्थानिक नेत्यांनी निर्णय घ्यायला काही हरकत नाही.’
भारतीय जनता पक्षाच्या मेळाव्यात झालेल्या स्वबळावर लढण्याच्या मागणीवर अजित पवार म्हणाले, ‘त्यासंदर्भात तीनही पक्षांचे नेते एकत्र निर्णय घेतील. प्रत्येक पक्षाला आपल्या अधिकाधिक जागा निवडून याव्यात, असेच वाटत असते. त्यासाठीच पक्षाचे नेते प्रयत्न करत असतात. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील विविध ठिकाणी दौऱ्यावर जात आहेत. शेवटी, प्रत्येकाला पक्षवाढीसाठी प्रयत्न करण्याचे स्वातंत्र्य आहे.’
‘समाजात चांगली प्रतिमा असलेल्या नेत्यांना प्रवेश देण्यात येत आहे. मात्र, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या, चांगली प्रतिमा नसलेल्या नेत्यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश दिला जाणार नाही,’ असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
अडचणीच्या ठिकाणी स्वबळावर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पुण्यात शुभारंभ लॉन्स येथे मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झाली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस या निवडणुकांबाबत भूमिका स्पष्ट केली.
ते म्हणाले, ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध भागांतील पक्षाचे खासदार, आमदार, अध्यक्ष यांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठका घेण्यात येत आहेत. भाजपसाठी सकारात्मक परिस्थिती आहे. निवडणूक लढविताना शक्य तेथे महायुतीच्या माध्यमातूनच निवडणूक लढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मात्र, महायुतीमधून निवडणूक लढवायची, की स्वबळावर, याचे अधिकार स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामध्ये कोणताही हस्तक्षेप केला जाणार नाही.’
‘निवडणुका जाहीर झाल्यानंतर चित्र स्पष्ट होणार’
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अजून जाहीर झाल्या नाहीत. निवडणुकांसाठी मोर्चे बांधणी, पक्षप्रवेश सुरू असले तरी, अद्याप कोणत्याही पक्षाकडून स्पष्ट भूमिका घेण्यात आली नाही. ‘निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर, अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी सगळे चित्र स्पष्ट होईल,’ असे अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.