पुणे-नाशिक मार्गावर बोटा गावानजीक तळपेवाडी शिवारात मोटार व टेम्पोची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात मोटारमधील पाचजण ठार, तर तिघे जखमी झाले. मृत्युमुखी पडलेले सर्व पुण्यातील हडपसरचे रहिवासी होते. लग्नसमारंभ आटोपून पुण्याकडे परतत असताना त्याच लग्नाच्या वऱ्हाडाची वाहतूक करणाऱ्या टेम्पोने पहाटे दीडच्या सुमारास पाचही जणांना चिरडले.
मच्छिंद्र मारुती हरगुडे (वय २२), शरद निवृत्ती पोतले (२८), ज्ञानेश्वर दत्तात्रेय सणस (४०), बाळू तुकाराम रोडकर (४७) व नानासाहेब दामोदर चव्हाण (वय ४२, सर्व राहणार हडपसर, पुणे) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. नवनाथ लेंडे (४०), संदीप कसबे (४७), योगेश साळुंके (२२, सर्व राहणार नांदर खंदरमाळ, संगमनेर) हे अपघातात जखमी झाले. वरीलपैकी लेंडे व सर्व मृत हडपसरमधील एका कंपनीत कामाला होते.
लेंडे यांच्या चुलत भावाच्या लग्नासाठी ते सगळे मोटारीतून आले होते. सायंकाळी विवाहसोहळा आटोपल्यानंतर लेंडे वऱ्हाडाला सोडून येण्यासाठी टेम्पो घेऊन (क्रमांक एमएच ०४-सीजी-३८४९) आळेफाटय़ाला गेले. तेथून परतत असताना त्याच लग्नासाठी आलेली मंडळी आपल्या मोटारीमधून पुण्याकडे निघाली होती. तळपेवाडी शिवारात ही दोन्ही वाहने समोरासमोर येऊन हा दुर्दैवी अपघात झाला. त्यातच रात्रीची वेळ असल्याने मदत मिळण्यासही मोठा विलंब झाला. माहिती मिळाल्यानंतर घारगाव ठाण्याचे पोलीस घटनास्थळी गेले व त्यांनी जखमींना रुग्णालयात हलविले. अपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. घटनास्थळी रक्तामांसाचा सडा पडला होता. सुरेश िशदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
संग्रहित लेख, दिनांक 22nd May 2013 रोजी प्रकाशित
संगमनेरजवळ मोटार व टेम्पोच्या धडकेत हडपसरचे पाच ठार
मोटार व टेम्पोची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात मोटारमधील पाचजण ठार, तर तिघे जखमी झाले. मृत्युमुखी पडलेले सर्व पुण्यातील हडपसरचे रहिवासी होते.
First published on: 22-05-2013 at 02:45 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All 5 from hadapser dead in motor tempo accident near sangamner