scorecardresearch

राष्ट्र सेवादलामध्ये आरोपांच्या फैरी

ज्येष्ठ भाषातज्ञ आणि राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांच्या कामकाजाविषयी आक्षेप घेण्यात येत असून राष्ट्र सेवा दलाच्या राज्य अध्यक्षपदासाठी रविवारी निवडणूक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आरोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.

डॉ. गणेश देवी यांच्या कामकाजाविषयी आक्षेप

पुणे : ज्येष्ठ भाषातज्ञ आणि राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांच्या कामकाजाविषयी आक्षेप घेण्यात येत असून राष्ट्र सेवा दलाच्या राज्य अध्यक्षपदासाठी रविवारी निवडणूक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आरोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. दरम्यान, संघटनेच्या विस्तारामध्ये शिक्षकांनी सहभागी होणे स्वागतार्ह की निषेधार्ह असा प्रश्न उपस्थित करून डॉ. गणेश देवी यांनी संघटनेच्या घटनेनुसारच कामकाज केले असल्याचे स्पष्ट केले आहे.

राष्ट्र सेवा दलाच्या नव्याने झालेल्या घटना दुरुस्तीनुसार तीन वर्षांनी निवडणूक होत असून जिल्हास्तरीय कार्यकारिणीची निवड यापूर्वी झाली आहे. राज्य अध्यक्ष निवडीसाठी रविवारी (२७ फेब्रुवारी) पुण्यामध्ये मतदान होईल. तर, पुढील रविवारी (६ मार्च) मुंबई येथे राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होणार आहे. साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष भारत सासणे हे निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून काम करीत आहेत. डॉ. गणेश देवी यांच्या कार्यकालात दलाचे कार्यकारी विश्वस्त आमदार कपिल पाटील यांच्या शिक्षक भारती संघटनेचे पदाधिकारी सेवा दलामध्ये आणण्यात आले असल्याचा आरोप जुन्या दल सेवकांनी केला आहे. त्या संदर्भात निवडणूक अधिकारी भारत सासणे यांच्याकडे लेखी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय कार्यकारिणीने अनेक कार्यकर्त्यांनाच संघटनेतून दूर केले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

माझ्याकडे अध्यक्षपद आले, तेव्हा सेवा दलाच्या महाराष्ट्रात ५५ शाखा तर बाहेरील राज्यामंध्ये १५ शाखा होत्या. माझ्या सामाजिक कामाच्या पुण्याईमुळे बंगाल, गुजरात, केरळ, उत्तर प्रदेश अशा विविध राज्यांमध्ये सेवा दलाचा विस्तार झाला आहे. आता देशपातळीवर १९५ शाखा कार्यरत आहेत. अन्य राज्यांमध्ये कपिल पाटील यांची शिक्षक भारती संघटना अस्तित्वात नाही. सेवा दलाचा विस्तार स्वागतार्ह आहे की नाही, असा सवाल डॉ. देवी यांनी उपस्थित केला. राष्ट्र सेवा दलाच्या कामकाजाविषयी आक्षेप घेणारी पत्रे माझ्याकडे आली. मात्र, ही संघटनेची अंतर्गत बाब असून या आक्षेपांची उत्तरे कार्यकारिणीने द्यायची आहेत. नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांच्या मदतीने संघटनेची निवडणूक सुरळीतपणे पार पाडणे एवढीच माझी जबाबदारी आहे.  – भारत सासणे, मुख्य निवडणूक अधिकारी, राष्ट्र सेवा दल

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Allegations in the national service prohibited questions ysh

ताज्या बातम्या