रसिकांचा अल्प प्रतिसाद; चित्रकार, छायाचित्रकांची प्रदर्शने रद्द

पुणे : करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या परिणामामुळे कलाविश्व पुन्हा ठप्प झाले आहे.  रसिकांच्या गर्दीअभावी कलादालने ओस पडू लागल्याने काही चित्रकार आणि छायाचित्रकारांनी आपली प्रदर्शने रद्द केली आहेत. काहींनी नियोजित प्रदर्शने पुढे ढकलल्याने शहरातील खासगी आणि महापालिकेची कलादालने तूर्तास बंद ठेवण्याचा निर्णय व्यवस्थापकांनी घेतला आहे.

महापालिकेची कलादालने सुरू असली तरी प्रदर्शनांची संख्या घटली आहे. करोनाच्या परिस्थितीत आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून बहुतांश चित्रकार आणि छायाचित्रकारांनी प्रदर्शनांचे नियोजन मार्चपर्यंत पुढे ढकलले आहे. आधीच दोन वर्षे आर्थिक नुकसान सहन करणाऱ्या चित्रकार आणि छायाचित्रकारांनी त्यामध्ये आणखी भर पडायला नको या उद्देशातून आपली प्रदर्शने रद्द केली आहेत. तर, काहींनी प्रदर्शन भरविण्याचा निर्णयच पुढे ढकलला आहे. त्यामुळे कलादालनांमध्ये तारखांचे करण्यात आलेले वाटप रद्द करण्यात आले आहे.  परिस्थितीचा अंदाज घेऊन मार्च किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात कलादालन सुरू करण्यात येणार आहे. तारखांचे वाटप करून पुन्हा प्रदर्शने रद्द करण्यापेक्षा कलादालन बंद ठेवण्याचा निर्णय खासगी कलादालनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे चर्चा करून घेतला असल्याचे आर्ट टुडे गॅलरीचे संचालक संजीव पवार यांनी सांगितले.

पूर्वी प्रदर्शनांमध्ये सहभागी होणाऱ्या बाहेरगावातील चित्रकारांची आणि छायाचित्रकारांची संख्याही मोठी होती. बाहेरगावाहून रसिकही प्रदर्शन बघायला यायचे. पण,गेल्या दोन वर्षांत  अन्य प्रदर्शनांची संख्याही कमी झाली आहे.   करोना संसर्गामुळे महापालिकेच्या कलादालनात जानेवारीत प्रदर्शने नाहीत. फेब्रुवारीत जवळपास पाच प्रदर्शने होणार आहेत. संपूर्ण फेब्रुवारीत प्रदर्शनांच्या तारखा आरक्षित असल्या तरी करोनाची स्थिती अशीच राहिली तर प्रदर्शने ऐनवेळी रद्द होऊ शकतात. – सुनील मते, व्यवस्थापक, बालगंधर्व रंगमंदिर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करोनापासूनची खबरदारी म्हणून कलादालन जानेवारी अखेपर्यंत बंद केले आहे. फेब्रुवारीत अंदाज घेऊन कलादालन सुरू करू. – गिरीश इनामदार, व्यवस्थापक, दर्पण आर्ट गॅलरी