पुणे : स्नानगृह स्वच्छ करण्यास नकार दिल्याने पाच अल्पवयीन मुलांनी मिळून टॉवेलच्या काठाच्या दोरीने गळा आवळून १७ वर्षांच्या मुलाच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना येरवड्यातील पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रात घडली. टॉवेल फाडून काढलेल्या काठाच्या दोरीने गळा आवळून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याबाबत संतोष किसन कुंभार (वय ४९, रा. चऱ्होली फाटा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रातील बराक क्रमांक दोनमध्ये मंगळवारी (१० जून) सकाळी सव्वानऊ वाजता घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हेगारीमध्ये अडकलेल्या अल्पवयीन मुलांना पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रात ठेवले जाते. यातील बराक दोनमधील एका १७ वर्षांच्या मुलाने स्नानगृह स्वच्छ करण्यास नकार दिला. या कारणावरून त्याचे इतर मुलांशी भांडण झाले. तेव्हा पाच अल्पवयीन मुलांनी या मुलाला हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. टॉवेल फाडून काढलेल्या काठाच्या दोरीने त्याचा गळा आवळून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार समजताच तेथील सुरक्षारक्षकाने या मुलाला वाचविले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येरवडा पोलिसांनी पाच अल्पवयीन मुलांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक विशाल टकले तपास करीत आहेत.