पुणे : बालभारती ते पौड फाटा या प्रस्तावित रस्त्यासाठी पर्यावरण विभागाचे प्रमाणपत्र घेतल्यानंतरच काम सुरू करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर या रस्त्यासाठी महापालिका प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. पर्यावरण विभागाचे प्रमाणपत्र लवकर घेण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. तसेच या परिसरात मोठ्या प्रमाणात स्थानिक आणि दुर्मिळ जातींची झाडे लावण्याचे आदेश दिले आहेत.

या रस्त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त राम यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन रस्त्याची पाहणी केली. पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, अधीक्षक अभियंता अभिजीत आंबेकर, कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम भुतडा, उपअभियंता शैलेश वाघोलीकर, मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे आणि क्षेत्रीय अधिकारी विजय नायकल आदी यावेळी उपस्थित होते. आयुक्तांनी या भेटीच्या दरम्यान रस्त्याच्या आराखड्याचा आढावा घेतला. त्यानंतर अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

पर्यावरण विभागाचे प्रमाणपत्र लवकर घेण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच या परिसरात मोठ्या प्रमाणात स्थानिक व दुर्मिळ जातींची झाडे लावण्यात यावेत, असे आदेश महापालिका आयुक्त राम यांनी दिले.

दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचे काम रखडले आहे. या भागातील काही नागरिकांनी तसेच पर्यावरणप्रेमींनी या रस्त्याला विरोध करत न्यायालयात याचिका दाखल केली होती. हा रस्ता वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार असून, पर्यावरणाची हानी होणार नसल्याची भूमिका महापालिका प्रशासनाच्या वतीने न्यायालयात मांडली होती. पर्यावरण विभागाचे प्रमाणपत्र घेतल्यानंतरच रस्त्याचे काम सुरु करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाने या रस्त्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी बालभारती-पौड रोडचे काम तातडीने हाती घेणे अत्यावश्यक आहे. यासाठी या भागाची पाहणी करुन आवश्यक सूचना केल्या आहेत. – नवल किशोर राम, आयुक्त पुणे महापालिका.