मार्चअखेर, वीज देयकाची थकबाकी, सर्व्हरमधील तांत्रिक अडचणी अशा विविध कारणांमुळे पुण्यात सलग तिसऱ्या आठवड्यात दस्त नोंदणीमध्ये अडथळे येत आहेत. सोमवारी (२८ मार्च) पुन्हा दस्त नोंदणीत अडथळे आल्याने दस्त नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांना आणि वकील वर्गाला नाहक त्रास सहन करावा लागला.

दोन आठवड्यांपूर्वी शासकीय मुद्रणालय आवारातील पुणे शहर आणि जिल्हा ग्रामीणच्या मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाची वीज महावितरणने खंडित केली होती. परिणामी या कार्यालयांसह याच इमारतीत असलेल्या दुय्यम निबंधक दहा, अकरा आणि तेवीस या कार्यालयांचे कामकाज सायंकाळपर्यंत ठप्प झाले होते. २४ मार्च रोजी देखील सर्व्हर डाउनमुळे दस्त नोंदणीत अडथळे आले होते. तसेच सोमवारी (२८ मार्च) मार्चअखेरमुळे मोठ्या प्रमाणात दस्त नोंदणी होत असल्याने सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड होऊन दस्त नोंदणीत अडथळे निर्माण झाले आहेत. परिणामी दुय्यम निबंधक कार्यालयांत दस्त नोंदणीसह इतर कामकाजासाठी आलेले वकील आणि पक्षकारांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, १ एप्रिल रोजी चालू बाजार मूल्यदर (रेडिरेकनर) जाहीर होणार आहेत. तसेच मेट्रोची कामे सुरू असलेल्या ठिकाणी म्हणजेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर महापालिका क्षेत्रात मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांवर एक टक्का मेट्रो अधिभार लागणार आहे. तसेच रेडिरेकनरचे दर वाढण्याची शक्यता असल्याने सध्या दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयांत नागरिक गर्दी करत आहेत. मात्र, दस्त नोंदणीतील अडथळ्यांमुळे वकील आणि पक्षकारांचा संपूर्ण दिवस याच कामासाठी खर्ची पडत आहे.