पुणे : ‘राजकारण आणि गुंडांच्या टोळ्यांमुळे वैभवशाली इतिहास असलेल्या बीड जिल्ह्याचे वर्तमान गंभीर दिसते आहे. परळीत घडलेल्या घटनांमुळे संपूर्ण बीड जिल्ह्याला बदनाम करता येणार नाही. दोन-चार संस्थानिक घराणी आणि त्यांचे कार्यकर्ते म्हणजे बीड जिल्हा नाही. बीडमधील मराठा आणि वंजारी हा राजकारणाने पेटवलेला वाद आहे. त्याने सगळ्या समाजाला वेठीस धरले आहे. त्याव्यतिरिक्त बीड जिल्ह्यात कोणताही जातिवाद नाही,’ असे मत इतिहास संशोधक डॉ. सतीश साळुंके यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
‘बीडमध्ये कला-साहित्य आणि सांस्कृतिक चळवळ बहरते आहे. इथल्या गावखेड्यांत सामाजिक सलोखा टिकून आहे. आजही इथली माणसे एकमेकांवर प्रेम करतात,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. सरहद, पुणेच्या वतीने ‘बीड वाचतंय’ या अभियानांतर्गत डॉ. सतीश साळुंके यांना ‘स्वामी रामानंद तीर्थ जीवनगौरव पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. त्या वेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. वासुदेव मुलाटे यांनी साळुंके यांच्याशी संवाद साधला.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे (एआयसीटीई) उपसंचालक डॉ. प्रशांत खरात, ‘सरहद’चे संजय नहार, शैलेश पगारिया, लेशपाल जवळगे आदी या वेळी उपस्थित होते.
‘प्राचीन-मध्ययुगीन काळातील अनेक राज्यकर्त्यांनी बीडमध्ये मंदिरे, वास्तू, शिल्पे उभारली. बीडचे वाङ्मयीन जीवनही समृद्ध होते. ज्या काळात उर्वरित महाराष्ट्राची सांस्कृतिक जडणघडण होत होती, त्या वेळी बीडमध्ये विपुल साहित्य निर्माण झाले. वेगवेगळ्या जाती-धर्माचे संत, महापुरुष या भूमीत जन्मले. स्वातंत्र्याच्या लढाया-उठाव, सामाजिक सुधारणा, सामाजिक सलोख्याच्या चळवळी बीडमधून सुरू झाल्याची अनेक उदाहरणे आहेत,’ असे साळुंके यांनी सांगितले.
ते म्हणाले, ‘देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधीजींचे जे महत्त्व आहे, ते स्थान स्वामी रामानंद तीर्थ यांचे हैदराबाद मुक्तीसंग्रामात आहे. बीड जिल्ह्यातील २२ जणांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वातील लढ्यात प्राणांची आहुती दिली. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात ज्या घटना घडल्या, त्या सर्व घटनांची पुनरावृत्ती हैदराबाद मुक्तीसंग्रामात झालेली दिसते. हा लढा तुलनेने अधिक क्रूर होता. उठाव करणारे जिवंत जाळण्यात आले, गावागावात सार्वजनकरीत्या त्यांच्या बायकांची अब्रू लुटण्यात येत होती, दगड मारून त्यांचे मुडदे पाडले जात होते, सांगता येणार नाहीत असे अमानुष अत्याचार निजामाने आणि त्याच्या रझाकारांनी केले.’
‘हैदराबाद मुक्तीसंग्राम हा धर्मनिरपेक्ष लढा’
‘हैदराबाद मुक्तीसंग्राम हा धर्मनिरपेक्ष लढा होता. तो जातीय लढा नव्हता. त्यात केवळ हिंदू होते, हे खोटे आहे. या लढ्यात आर्य समाज, अस्पृश्यांसह सर्व जाती-धर्मांच्या माणसांचा मोठा सहभाग होता. या लढ्याला जातीयतेचा रंग देण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, तो प्रयोग स्टेट काँग्रेसने हाणून पाडला. हा लढा शेतकरी, कष्टकरी, कामगार, चेहरा नसलेल्या लाखो लोकांचा आहे,’ असे डॉ. सतीश साळुंके यांनी सांगितले.