संघाचे काम हे ईश्वरीय कार्य मानणाऱ्यांमुळे संघाचे अस्तित्व

सत्ताबदल झाल्यावर आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहोत, असे म्हणणारे अनेक जण भेटतात.

भारतीय किसान संघाचे शहराध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब चव्हाण यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांच्या हस्ते बुधवारी त्यांचा सत्कार करण्यात आला. नाना जाधव आणि अ‍ॅड. दादासाहेब बेंद्रे या वेळी उपस्थित होते.  
संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांचे मत

सत्ताबदल झाल्यावर आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहोत, असे म्हणणारे अनेक जण भेटतात. प्रतिकूल परिस्थिती आल्यानंतर संघाशी बालपणी चुकून संबंध आला होता, असे म्हणणारेही अनेक जण आहेत. परिस्थिती अनुकूल असो किंवा प्रतिकूल; प्रवाहाविरुद्ध चालण्यामध्ये पुरुषार्थ दाखविणाऱ्यांमध्ये अ‍ॅड. बाबासाहेब चव्हाण अग्रभागी आहेत, असे गौरवोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी बुधवारी काढले. संघाचे काम हे ईश्वरीय कार्य मानणाऱ्यांमुळे संघाचे अस्तित्व टिकून आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

भारतीय किसान संघाचे शहराध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब चव्हाण यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त जोशी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. संघाचे पश्चिम महाराष्ट्र संघचालक नाना जाधव आणि अमृतमहोत्सव समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. दादासाहेब बेंद्रे या वेळी उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी दिलेले एक लाख रुपयांची देणगी अ‍ॅड. चव्हाण यांनी भारतीय किसान संघाच्या कार्यासाठी अ‍ॅड. बेंद्रे यांच्याकडे सुपूर्द केली. अ‍ॅड. बाबासाहेब चव्हाण अमृतमहोत्सव गौरव ग्रंथाचे प्रकाशन जोशी यांच्या हस्ते या वेळी झाले.

माणसं घडविणे हे संघाचे काम आहे, असे सांगून जोशी म्हणाले, साहित्यातून घडलेली माणसे प्रत्यक्ष जीवनात काही करू शकत नाहीत. पण, साहित्य निर्मिती न करताही आयुष्यभर माणसं घडविण्याचे काम करणाऱ्यांचे बाबासाहेब हे प्रतिनिधी आहेत. त्यांच्या मैत्रीला वयाचे, शिक्षणाचे, आर्थिक परिस्थितीचे कुंपण नाही. बोलता आलं नाही तरी चालेल. पण, काम करता आलं पाहिजे हे त्यांनी अमलात आणले. आंतरिक तळमळ कार्य करण्याला प्रेरणा देत असते. बाबासाहेबांच्या ध्येयनिष्ठेला सशक्त आधार असल्याने त्यांनी विचारांशी, व्यवहाराशी आणि कार्याशी कधी तडजोड केली नाही.

अ‍ॅड. चव्हाण म्हणाले, मी केलेले कार्य हे कोणा एका व्यक्तीचे नाही. मी ज्यांच्याबरोबर होतो अशा स्वयंसेवक बंधूंचा त्यामध्ये महत्त्वाचा वाटा आहे. त्या काळातील नाना पालकर, तात्या बापट अशा कार्यकर्त्यांना मी हा गौरव समर्पित करतो. अ‍ॅड. बेंद्रे म्हणाले, कोणतीही गोष्ट सातत्याने करणे, सर्वाना बरोबर घेऊन जाणे हा संघाचा संस्कार आहे. संघर्ष करण्याची क्षमता असलेले अनेक कार्यकर्ते बाबासाहेबांनी घडविले. श्याम भुर्के यांनी सूत्रसंचालन केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bhaiyyaji joshi commented on rss work