पुणे : ‘पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील शहरी गरीब योजनेत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचार प्रकरणाची माहिती, माहिती अधिकारातून समोर आणल्यानेच या विभागातील महिला अधिकाऱ्याने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली,’ असा दावा भाजपच्या कामगार आघाडीचे शहराध्यक्ष ओंकार कदम यांनी शुक्रवारी केला.
कदम त्रास देत असल्याची तक्रार आरोग्य विभागातील एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने महिला आयोगाकडे दिली आहे. या पार्श्वभूमीवर कदम यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, ‘शहरी गरीब योजनेच्या माध्यमातून गेल्या सात वर्षांपासून भ्रष्टाचार सुरू आहे. याबाबतचे पुरावे आमच्याकडे आहेत. ते आम्ही माहितीच्या अधिकारात आणि सूत्रांकडून मिळविले आहेत. या प्रकरणामध्ये संबधित महिला अधिकाऱ्यावर कारवाई होणार असल्याने त्यांनी ही तक्रार केली आहे.’