पिंपरी-चिंचवडमध्ये आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्या चंद्ररंग या कन्स्ट्रक्शन कार्यालयावर अज्ञातांनी रॉकेलने भरलेल्या बाटल्या पेटवून फेकल्याचा घटना घडली आहे. यात सुदैवाने दुर्घटना घडलेली नाही. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली असून संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. अज्ञात तिघांनी हे कृत्य केल्याचं सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांचे सृष्टी चौक पिंपळे गुरव परिसरात चंद्ररंग नावाचे कन्स्ट्रक्शन कार्यलय आहे. तिथे आज दुपार च्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या अज्ञात तीन तरुणांनी कार्यलायाच्या दिशेने रॉकेल ने पेटवलेल्या दोन बाटल्या फेकल्या. पैकी एक बाटली कार्यालयाच्या काचेच्या बाजूला फुटली. यात सुदैवाने कोणतीही जीविहितहानी किंवा कोणी जखमी झालेले नाही. या प्रकरणानंतर सांगवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोनपे यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनेनंतर परिसरातील कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.
“अनोळखी तीन व्यक्तींनी त्यांच्या हातात असलेल्या रॉकेल ने पेटलेल्या बाटल्या कार्यलायच्या दिशेने फेकल्या. यात जीवितहानी किंवा नुकसान झालं नाही. सीसीटीव्ही वरून आरोपींचा शोध घेत आहोत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व बाजूनी आम्ही तपास करत आहोत”.
आनंद भोईटे – पोलीस उपायुक्त