पुणे : गेल्या काही दिवसांमध्ये हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी झाले. कोरड्या हवेमुळे रात्री आणि पहाटे चांगला गारवा जाणवू लागला आणि ऐन दिवाळीत गुलाबी थंडी पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र ‘दाना’ चक्रीवादळ ओडिशाच्या किनाऱ्याला धडकल्यानंतर हवेतील बाष्प पश्चिमेकडे येत आहे. त्यामुळे दिवाळीत राज्याच्या अनेक भागांत विजांचे फटाके आणि ठिणग्यांची आतषबाजी करणाऱ्या पावसाऐवजी खराखुरा पाऊस अनुभवावा लागणार आहे.

मोसमी वारे माघारी फिरल्यानंतरही ऑक्टोबरचे पहिले दोन आठवडे राज्यभरात पाऊस कायम होता. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ठिकठिकाणी पाऊस पडला. गेल्या आठवड्याभरात पावसाचे प्रमाण कमी झाले. त्यानंतर तापमानात वाढ होऊन काही ठिकाणी ‘ऑक्टोबर हिट’ जाणवू लागली. आता हवामान विभागाने २९ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत पावसाचा अंदाज वर्तवला आहे. काही ठिकाणी आज, सोमवारपासूनच पाऊस होण्याची शक्यता आहे. आकाश ढगाळ होऊन काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचे ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ अनुपम कश्यपी म्हणाले. २९ आणि ३० ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, रायगड, सातारा, सिंधुदुर्ग, जालना, परभणी, हिंगोली, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांत तर ३१ ऑक्टोबर रोजी यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा येथे ‘पिवळा इशारा’ देण्यात आला आहे.

हेही वाचा : Congress Candidates List : मविआच्या जागा वाटपात काँग्रेस शंभरी पार, सम-समान फॉर्म्युल्यावर प्रश्नचिन्ह!

u

हवेची गुणवत्ता खालावणार?

हवेतील धुलिकणांवर हवेची गुणवत्ता अवलंबून असते. गेल्या काही दिवसांत हवामान कोरडे झाल्यामुळे धुलिकणांचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यात आता दिवाळीतील फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषण वाढून हवेची गुणवत्ता खालावण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘दाना’ चक्रीवादळ येऊन गेल्यानंतर हवेतील बाष्पाचा पश्चिमेकडे प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.