पुणे : आजारी असल्याचा बहाण करुन पादचारी तरुणींना दुचाकीवरुन सोडण्यास सांगून अश्लील कृत्य करणाऱ्या शनिवार पेठेतील चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली. आरोपीने दुचाकीवरुन सोडण्यास सांगून डेक्कन, एरंडवणे, चतु:शृंगी परिसरात तरुणींशी अश्लील कृत्य केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी त्यांचा मोबाइल क्रमांक समाजमाध्यमात प्रसारित केला होता. पोलीस आयुक्तांनी तक्रारीची दखल घेऊन पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले.अनुप प्रकाश वाणी (वय ४४, रा. शनिवार पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ जुलै रोजी रात्री दहाच्या सुमाास फिर्यादी तरुणी आणि तिची मैत्रीण सेनापती बापट रस्त्याने निघाल्या होत्या. त्या वेळी वाणी दुचाकीवरुन तेथे आला. मला चक्कर येत असून दुचाकी चालविता येत नाही, असे वाणी याने सांगितले. तरुणीने त्याला मदत करण्यासाठी वाणीला दुचाकीवरुन सोडते, असे सांगितले. तरुणी दुचाकी चालवित असताना काही अंतरावर वाणीने तिच्याशी अश्लील कृत्य केले. तरुणी घाबरली. तरुणीची मैत्रीण सायकवलवरुन तेथे आली. वाणी दुचाकीवरुन पसार झाला.
हेही वाचा >>>पुणे : पतीच्या अंगावर ओतले उकळते पाणी…’हे’ कारण
हेही वाचा >>>सावधान! पक्षी, प्राण्यांपासून बर्ड फ्लू संसर्गाचा मानवाला धोका
दरम्यान, पोलीस आयुक्तांनी महिला सुरक्षिततेसाठी समाजमाध्यमावर प्रसारित केलेल्या मोबाइल क्रमांकावर तरुणीने तक्रार नोंदविली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले. पोलिसांनी वाणीला ताब्यात घेतले. त्याने तरुणींकडे लिफ्ट मागण्याचा बहाणा करुन तरुणींशी अश्लील वर्तन करण्याचे गु्न्हे केले आहेत, असे चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी सांगितले.