पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला साथ दिली, तर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची रक्कम दरमहा दीड हजार रुपयांवरून तीन हजार रुपये केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या योजनेला खोडा घालणाऱ्यांना आम्ही पुरून उरलो आहोत. अशा कपटी आणि सावत्र भावांना जागा दाखवा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा वचनपूर्ती कार्यक्रम बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी, श्रीरंग बारणे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की राज्यात ५० ते ६० वर्षे काँग्रेसचे सरकार होते. त्यांनी सर्वसामान्य बहिणींसाठी काहीही केले नाही. काँग्रेस सरकारच्या काळात एक रुपयाची मदत दिली, तर प्रत्यक्षात लाभार्थ्यांना केवळ १५ पैसे मिळत होते. मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे योजनेची सर्व रक्कम महिलांच्या खात्यात जमा होत आहे. राज्यात महायुती सरकारने सुरू केलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महिन्याला दीड हजार आणि वर्षाला १८ हजार रुपये बहिणींना मिळणार आहेत.

हेही वाचा >>>लाडकी बहीण योजना दीर्घकाळासाठी!

ही योजना जाहीर केल्यापासून त्यामध्ये खोडा घालण्यासाठी अनेकदा प्रयत्न करण्यात आले. ही फसवी योजना आहे, लाच देता का, भेट देता का, विकत घेता का, यांसारखे अनेक आरोप आमच्यावर करण्यात आले. पण बहिणींबद्दल बोलताना तुम्हाला लाज कशी वाटत नाही? महायुती सरकारने सुरू केलेल्या या योजनेमुळे बहिणींना आता कोणाच्या समोर हात पसरावा लागणार नाही, असेही शिंदे म्हणाले.

सप्टेंबरपर्यंत मदत

या योजनेंतर्गत ३१ जुलैपर्यंत आलेल्या अर्जांची छाननी करण्यात येत आहे. संबंधित बहिणींना ऑगस्टमध्ये मदत देण्यात येईल. ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या बहिणींना दोन महिन्यांचे तीन हजार रुपये सप्टेंबरमध्ये दिले जातील. आता दर महिन्याला बहिणींना पंधराशे रुपयांची रक्कम ही ‘माहेरचा आहेर’ म्हणून मिळणार आहे. विरोधकांसाठी ही रक्कम किरकोळ आहे. मात्र, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येणाऱ्यांना या पंधराशे रुपयांचे मोल काय कळणार, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पूर्वीच्या सरकारकडून अनेक योजना बंद फडणवीस

महायुती सरकारने समाजातील प्रत्येक घटकातील नागरिकांसाठी योजना सुरू केलेल्या आहेत. मात्र महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर या सर्व योजना बंद केल्या जातील, अशी भीती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री असताना आपण सुरू केलेल्या अनेक योजना महाविकास आघाडीने सत्तेत आल्यानंतर बंद केल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला.