पुणे : महापालिकेच्या वतीने तयार केल्या जाणाऱ्या अंदाजपत्रकात नागरिकांना थेट सहभाग घेता येणार आहे. पुढील आर्थिक वर्षासाठी (२०२६-२७) तयार केल्या जाणाऱ्या अंदाजपत्रकात नागरिकांना आवश्यक कामे सुचविता येणार आहेत. यासाठी यंदाच्या वर्षी ही प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली असून, नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने सूचना करता येणार आहेत. https://pbpune.pmc.gov.in या संकेतस्थळावर या सूचना नोंदविण्याची सोय महापालिकेने उपलब्ध करून दिली आहे.
महापालिकेच्या अंदाजपत्रकात प्रशासन आवश्यक कामांसाठी निधीची तरतूद करते. यामध्ये नागरिकांचा सहभाग वाढावा, नागरिकांना त्यांच्या भागात कोणती कामे होणे गरजेचे आहे. हे महापालिकेला सांगता यावे. तसेच, नागरिकांनी सुचविलेल्या कामासाठी स्वतंत्र निधी देता यावा, यासाठी २००६-०७ पासून पुणे महापालिकेत हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या सूचनांच्या आधारे आवश्यक त्या विकासकामांचा समावेश दरवर्षीच्या अंदाजपत्रकात केला जातो.
अंदाजपत्रक तयार करण्यात नागरिकांचा सहभाग निश्चित करण्यासाठी महापालिका प्रशासनाने वेळापत्रक तयार केले आहे. याबाबत महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक प्रभाग समितीने वर्तमानपत्रात जाहीर आवाहन करून १ सप्टेंबर २०२५ पर्यंत नागरिकांकडून कामांच्या प्रस्तावांची मागणी करावी. या प्रस्तावांसाठी निधी मर्यादा निश्चित करण्यात आली असून, तीन सदस्यांच्या प्रभागासाठी जास्तीत जास्त ७५ लाख रुपये, दोन सदस्यांच्या प्रभागासाठी जास्तीत जास्त ५० लाख रुपये तसेच, एका कामासाठी प्रस्तावित रक्कम पाच लाखांपेक्षा अधिक नसावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
नागरिकांकडून सुचविण्यात आलेल्या कामांचे प्रस्ताव प्रभाग समितीच्या बैठकी चर्चेसाठी मांडले जाणार आहेत. या कामांचे प्राधान्यक्रम ठरवून त्याला अंतिम मंजुरी दिली जाणार आहे. त्यानंतर हे प्रस्ताव संबंधित क्षेत्रीय उपायुक्तांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवले जातील. प्रशासक तथा प्रभाग समिती अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत नागरिकांच्या सूचनांवर सविस्तर चर्चा करून अंदाजपत्रकाच्या प्रारूप आराखड्याला अंतिम रूप दिले जाणार आहे.
शहरासाठी तयार होणाऱ्या अंदाजपत्रकात प्रस्तावित केलेल्या योजना केवळ कागदावर न राहता, जनतेच्या खऱ्या गरजा आणि प्राधान्यक्रम यांची माहिती समजावी, यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण भूमिका बजाविणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने यात सहभागी होऊन आपल्या भागातील आवश्यक त्या कामांचे प्रस्ताव द्यावेत, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
दहा ऑक्टोबरपर्यंत प्रस्ताव अनिवार्य
नागरिकांनी सुचविलेल्या कामांच्या प्रस्तावांना प्रभाग समितीची मान्यता मिळाल्यानंतर, सहायक आयुक्तांनी त्यांच्या अखत्यारीतील सर्व प्रभागांची एकत्रित माहिती निश्चित नमुन्यात १० ऑक्टोबर २०२५ पर्यंत महापालिका आयुक्तांकडे सादर करावे, अशा सूचना क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांना देण्यात आल्या आहेत.