पुणे :पुणे महापालिकेचे मिळकतकराचे बिल मिळण्यापूर्वीच नागरिकांनी महापालिकेच्या तिजोरीत ४९ कोटी ६ लाख रुपयांची रक्कम मिळकतकरापोटी जमा केली आहे. महापालिकेने यंदा १ मेपासून मिळकतकर बिलांचे वाटप करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, त्यापूर्वीच १३ हजार ५९० मिळकतदारांनी कर महापालिकेकडे जमा केला आहे.


महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत म्हणून मिळकतकर विभागाकडे पाहिले जाते. २०२५-२६ च्या अंदाजपत्रकात मिळकतकर विभागाला २ हजार ८४७ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार मिळकतकरात ४० टक्के सवलत मिळविण्यासाठी महापालिकेने नागरिकांकडून पीटी-३ क्रमांकाचे अर्ज भरून घेतले होते. या अर्जांची छाननी करून त्यावर निर्णय न झाल्याने मिळकतकर विभागाने एक महिन्याची मुदतवाढ घेऊन चालू आर्थिक वर्षाचे मिळकतकराचे बिल एक एप्रिलऐवजी एक मेपासून देण्याचे जाहीर केले.त्यानुसार महापालिकेने एक मेपासून बिले देण्यास सुरुवात केली.

यंदा मिळकतकरात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाचे मिळकतकराचे बिलही काही नागरिकांनी भरून टाकले आहे. १ ते ३० एप्रिल या काळात महापालिकेच्या बिलांची वाट न पाहता १३ हजार ५९० मिळकतदारांनी बिले भरली असल्याची माहिती मिळकतकर विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महापालिकेचा मिळकतकर वेळेत भरणाऱ्या मिळकतदारांना पाच ते दहा टक्के सवलत मिळते. ३० जूनपर्यंत या सवलतीचा लाभ घेता येणार आहे. दोन ते तीन दिवसांत मिळकतदारांना त्यांचे बिल मिळेल. तसेच मोबाइल क्रमांकावर मेसेजदेखील पाठविला जाणार आहे.- प्रतिभा पाटील, उपायुक्त, मिळकतकर विभाग, पुणे महापालिका