पुणे : राज्यातील नागरिकांना घरबसल्या आवश्यक सेवा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा आहे. नागरिकांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या ११०० सेवा ऑनलाइन आणि व्हॉट्सॲपवर उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यातील ९० टक्के सेवा पुढील दोन महिन्यांमध्ये डिजीटल करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या ‘४ जी’ तंत्रज्ञानाधारित सेवेचे लोकार्पण ओडिशा, झारसुगुडा येथे झाले. या अंतर्गत भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) ९२ हजार ६३३ टॉवर्सचे लोकार्पण करण्यात आले. त्यापैकी ९ हजार २० टॉवर्स महाराष्ट्रात उभारले गेले आहेत.
येरवडा येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक कला मंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय युवक कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, भारती एअरटेलचे संस्थापक अध्यक्ष सुनील मित्तल, खासदार मेधा कुलकर्णी, बीएसएनएलचे मुख्य महाव्यवस्थापक हरिंदर कुमार, दूरसंचार विभागाचे विशेष महासंचालक आर. के. गोयल आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘देशातील तसेच राज्यातील लाखो लोकांपर्यंत ४ जी तंत्रज्ञान पोहोचणार असून महाराष्ट्र शासनाच्या ११०० ऑनलाईन सेवा गावागावात पोहोचण्यात या कनेक्टिव्हिटीचा मोठा फायदा होणार आहे. या सेवेमुळे नागरिकांना बसल्या जागी त्यांच्या अर्जाची माहिती मिळेल. दोन महिन्यात नागरिकांना आवश्यक असलेल्या ९० टक्के सेवा डिजिटल केल्या जाणार आहेत. यामुळे या सेवांसाठी अर्ज दाखल केलेल्या नागरिकांना त्यांची फाईल नक्की कुठे आहे, याची संपूर्ण माहिती मिळणार आहे. यात कोठेही दिरंगाई झाल्यास संबंधित अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार देखील दाखल करता येणार आहे. या तंत्रज्ञानामुळे सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने करण्यात येणार आहे.’
‘बीएसएनएल नफ्यात आले असून प्रगती करत असल्याचा आनंद आहे. स्वदेशी ‘४जी’ तंत्रज्ञान विकसित करून डिजिटल भारताकडे आपली वाटचाल सुरू आहे. बीएसएनएलची ही यशोगाथा उल्लेखनीय ठरेल.’ असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
‘रस्त्यांबरोबरच कनेक्टिव्हिटी गरजेची’
गावाच्या विकासासाठी केवळ रस्तेच नव्हे तर ‘कनेक्टिव्हिटी’देखील तेवढीच महत्त्वाची असल्याचे लक्षात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक गावात मोबाईल टॉवर कसा उभारला जाईल, यासाठी प्रयत्न केले. गावात इंटरनेट पोहोचते तेव्हा आपण गावाला जगाशी जोडत असतो. आरोग्य, शिक्षण क्षेत्रासाठी कनेक्टीव्हीटी महत्वाची आहे. शेतकऱ्यांना हवामानाची, वातावरण बदलाची माहिती देवून त्यांचे नुकसान टाळता येते. स्मार्ट व्हिलेजच्या सहाय्याने गावातील सर्व व्यवस्था उत्तम करता येतात. उद्योग, शेती, बाजारासाठी कनेक्टीव्हीटी महत्वाची आहे. कनेक्टीव्हीटीमुळे व्यवस्थेत परिवर्तन होण्यासोबत पारदर्शकता येते. तंत्रज्ञान ही भेदरहित व्यवस्था आहे,’ असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.