कात्रज बोगदा ते नवले पूल या दरम्यान होणारे अपघात रोखण्यासाठी खासगी संस्थेने प्रस्तावित केलेल्या उपाययोजनांनुसार अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू झाली आहे. मात्र उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी आणि संस्थेने दिलेल्या अहवालातील प्राथमिक उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी मंगळवारी बैठक होणार आहे.

कात्रज बोगद्यापासून नवले पूल या चार किलोमीटर अंतरामध्ये तीव्र उतार आहे. उताराबरोबरच रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अतिक्रमणांमुळे अपघात होत असल्याचे निरीक्षण जिल्हा प्रशासनाने नियुक्त केलेल्या खासगी संस्थेकडून नोंदविण्यात आले होते. अपघात रोखण्यासाठी या संस्थेने काही उपाययोजनाही प्रस्तावित केल्या आहेत. या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत दिले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संस्थेने प्रस्तावित केलेल्या उपाययोजनानुसार महामार्ग सेवा रस्त्यांवरील अतिक्रमणे काढून टाकण्याची कार्यवाही राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून सुरू करण्यात आली आहे. सेवा रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांना नोटिसा बजाविण्यात येत आहेत. तसेच मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत सूचना फलक लावण्यात येत असून जास्त उंचीचे रम्बलर्स उभारण्याची कार्यवारी सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. कात्रज बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर उतारावर वाहनचालकांचे वेग नियंत्रित रहावेत, यासाठी स्वतंत्र नाका उभारण्यात येणार आहे. हलकी आणि अवजड वाहनांची विभागणी करण्यात येणार असून अवजड वाहनांसाठी सात किलोमीटर अंतरापर्यंत स्वतंत्र मार्गिका उभारण्यात येईल. या उपाययोजनांसंदर्भातील अहवाल येत्या काही दिवसांत प्राप्त होणार आहे. मात्र त्यावर बैठकीत चर्चा होणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.