पुणे : विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुणे शहरात स्वतंत्रपणे ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’ची गरज आहे. शहरातील उद्योजक, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अभ्यासक गेली अनेक वर्षे ही मागणी मांडत आहेत. मात्र, केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजप सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे.

‘आयआयएम’चे स्वतंत्र केंद्र पुण्यात न झाल्याने आयटी क्षेत्रातही नाराजी पसरली आहे. पुण्यात आवश्यक जागा, शैक्षणिक वातावरण, शिक्षणतज्ज्ञ उपलब्ध असतानाही नागपूर, त्यानंतर मुंबई या भागांमध्ये हे केंद्र उभे रहाते, पुण्याकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते, असा आरोप केला जात आहे.

‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) चे स्वतंत्र केंद्र पुण्यात होण्याऐवजी उपकेंद्र होणार आहे. ही घोषणा निराशाजनक असून, भाजपचे सरकार नेहमी पुण्याला दुय्यम वागणूक का देत आहे,’ असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना विचारला आहे.

‘भारतीय जनता पक्षाच्या सरकारने मेट्रो, नदी सुधार, रिंग रोड प्रकल्प राबविताना प्रत्येकवेळी पुण्याला दुय्यमच वागणूक दिलेली आहे. पीएमपी बससेवेत अधिकारी नेमतानाही अस्थिरता ठेवलेली आहे. मोठ्या प्रकल्पांच्या केवळ घोषणा करणे, पंतप्रधान मोदी यांनी येऊन मेट्रोचे तीन, चार वेळा उदघाटन करणे असे देखाव्याचे कार्यक्रम चालले आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी गाजावाजा करून सुरू केलेल्या स्मार्ट सिटीमधून शहराचा विकास झालेला नाही,’ असा आरोपही जोशी यांनी केला.