पुणे : राज्यातील करोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून, गेल्या २४ तासांत ६९ रुग्ण आढळले आहेत. त्यातील सर्वाधिक ३७ रुग्ण मुंबईत असून, त्याखालोखाल ठाण्यात रुग्णांची संख्या वाढली आहे. राज्यात मे महिन्यातील करोनाची एकूण रुग्णसंख्या ३६९ वर पोहोचली आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांत करोनाचे ६९ रुग्ण आढळले. त्यात मुंबई ३७, ठाणे महापालिका १९, नवी मुंबई महापालिका ७, पुणे महापालिका २ आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, लातूर महापालिका, रायगड, कोल्हापूर प्रत्येकी १ अशी रुग्णसंख्या आहे. राज्यात १ जानेवारी ते २६ मेपर्यंत करोनाच्या ७ हजार ८३० संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात ३६९ रुग्णांना करोनाचे निदान झाले. त्यात मुंबईत सर्वाधिक २८५ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील करोनाची सक्रिय रुग्णसंख्या २७८ असून, ८७ रुग्ण बरे झाले आहेत.

राज्यात जानेवारीपासून आतापर्यंत करोनाच्या ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व रुग्ण सहव्याधीग्रस्त होते. त्यातील एका रुग्णास मूत्रपिंडविकारासह चेताविकार होता, तर दुसऱ्या रुग्णास कर्करोग होता. तिसऱ्या रुग्णास ब्रेन स्ट्रोक आला होता आणि त्याला अपस्माराचा आजार होता. चौथ्या रुग्णास गंभीर स्वरूपाचा मधुमेहाचा आजार होता, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

राज्यातील करोना संसर्ग (१ जानेवारी ते २६ मे)

करोना चाचण्या – ७ हजार ८३०
एकूण रुग्ण – ३६९

मुंबईतील रुग्ण – २८५
सक्रिय रुग्ण – २७८
बरे झालेले रुग्ण – ८७
रुग्ण मृत्यू – ४

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जनुकीय क्रमनिर्धारण करणार

राज्यात करोना रुग्णसंख्येत वाढ नेमकी कशामुळे सुरू आहे, हे तपासण्यासाठी करोना विषाणूच्या प्रकाराचे जनुकीय क्रमनिर्धारण केले जाणार आहे. पुण्यात करोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांचे नमुने बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयात जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात येणार आहेत. याबाबत महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते यांच्यासह इतर तज्ज्ञांची बैठक सोमवारी झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी दिली.