पुणे : बांधकाम कामगारांसाठी केंद्रासह राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत. या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याने ते त्यापासून वंचित राहतात. त्यामुळे क्रेडाई-पुणे मेट्रोच्या वतीने बांधकाम कामगारांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गेल्या आर्थिक वर्षात हजारो बांधकाम कामगारांना यामुळे फायदा झाला आहे.
क्रेडाई-पुणे मेट्रोच्या कामगार कल्याण समितीमार्फत विविध उपक्रम राबवले जातात. त्यात कामगारांसाठी वैद्यकीय शिबिरे, कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी नोंदणी आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे या उपक्रमांचा समावेश आहे. गेल्या आर्थिक वर्षात (एप्रिल २०२४ ते मार्च २०२५) कालावधीत या योजनांचा हजारो कामगारांना फायदा झाला आहे. कामगार कल्याण समितीकडून गेल्या आर्थिक वर्षात इमारत व अन्य बांधकाम क्षेत्रातील १० हजार ३६२ कामगारांची नोंदणी करण्यात आली. यामुळे हे कामगार सरकारी योजनांसाठी पात्र ठरले. याचबरोबर आयुष्मान भारतअंतर्गत ४ हजार ५६० कामगारांची नोंदणी करण्यात आली. तसेच, ई-श्रम योजनेत १ हजार ७०९ कामगारांची नोंदणी करण्यात आली.
समितीकडून कामगारांसाठी इतर उपक्रमही राबविण्यात आले. त्यात १० हजार ५६० कामगारांना सुरक्षा साहित्याचे वाटप करण्यात आले. कामगारांच्या मुलांसाठी आरोग्य व पोषण सेवा योजना राबविण्यात आली. त्याचा फायदा एकूण २५ हजार ६०५ मुलांना झाला. याचबरोबर कामगारांच्या ७०० मुलांचे लसीकरण करण्यात आले. याबाबत कामगार कल्याण समितीचे संयोजक मिलिंद तलाठी म्हणाले की, आपण केवळ शहरे उभारत नाही, तर जीवन समृद्ध करीत आहोत. कामगारांच्या चेहऱ्यावर उमटलेले प्रत्येक हसू, त्यांच्या आत्मसन्मानाचे प्रत्येक पाऊलही सर्व उद्याची पायाभरणी आहे. प्रत्येक उंच इमारतीच्या मागे एक मूक नायक उभा असतो. अशा बांधकाम कामगारांना कल्याणासाठी उपाययोजना करण्यास क्रेडाईकडून प्राधान्य दिले जात आहे.
आभार सप्ताहाचे आयोजन
आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त क्रेडाईच्या वतीने १ ते ७ मेदरम्यान ‘आभार सप्ताह’ आयोजित करण्यात आला. या सप्ताहानिमित्त कुमार रिॲल्टी आणि क्रेडाईच्या वतीने हिंजवडी येथील मेगापोलिस प्रकल्पस्थळी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी कामगारांसाठी आरोग्य तपासणी आणि धनुर्वात लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले.