पुणे : शहराच्या वेगवेगळ्या भागात घरफोडी तसेच वाहन चोरीचे गुन्हे करणाऱ्या चोरट्याला गुन्हे शाखेने पकडले. त्याच्याकडून दुचाकी, मोटार, सोन्याचे दागिने असा २० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरट्याने १४ गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे.

अक्षयसिंग बिरुसिंग जुनी (वय १९, रा. वैदुवाडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याने वानवडी, बंडगार्डन हडपसर, मार्केट यार्ड, मुंढवा, लोणी काळभोर, लष्कर, चिंचवड इंदापूर परिसरात घरफोडी आणि वाहन चोरीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. शहरात घरफोडी तसेच वाहनचोरीचे गुन्हे वाढीस लागले आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे पथक गस्त घालत होते.

हेही वाचा : रेल्वेत मुलीवर अत्याचार करणाऱ्याला पुण्यातून अटक ; भोपाळ ते पुणे झेलम एक्स्प्रेसमधील घटना

त्या वेळी अक्षयसिंग जुनीने घरफोडीचे गु्न्हे केल्याची माहिती पोलीस कर्मचारी अकबर शेख, विनोद शिवले यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून चार मोटारी, सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक निरीक्षक कृष्णा बाबर, अकबर शेख, विनोद शिवले, प्रमोद टिळेकर, पांडुरंग कांबळे, रमेश साबळे, चेतन चव्हाण, अजय गायकवाड आदींनी ही कारवाई केली.