पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी कर्वेनगर भागातील संगणक अभियंत्याची एक कोटी ३८ लाख रुपयांची फसवणूक केली याप्रकरणी शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्वेनगर भागातील संगणक अभियंता राहायला आहे. याबाबत अभियंत्याने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अभियंत्याच्या समाज माध्यमातील खात्यावर चोरट्यांनी एक लिंक पाठविली होती. शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले होते. संबंधित लिंक उघडल्यानंतर चोरट्यांनी त्यांना शेअर बाजारातील विविध योजनांची माहिती दिली. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना ऑनलाइन पद्धतीने बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. सुरुवातीला व्यावसायिकाने गुंतविलेल्या रक्कमेवर चोरट्यांनी परतावा दिला. परतावा मिळाल्याने अभियंत्याचा विश्वास बसला. त्यानंतर चोरट्यांनी आणखी रक्कम गुंतविण्यास सांगितले.

जादा परताव्याच्या आशेने संगणक अभियंत्याने एक कोटी ३८ लाख रुपये गुंतविले. रक्कम गुंतविल्यानंतर चोरट्यांनी त्यांंना परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे नुकतीच तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे तपास करत आहेत. सायबर चोरट्यंनी अशाच पद्धतीने धायरीतील एकाची १९ लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत एकाने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस तपास करत आहेत.

कारवाईची भीती दाखवून ज्येष्ठाची २३ लाखांची फसवणूक

कारवाईची भीती दाखवून ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी २३ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका ७८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ नागरिक सहकारनगर भागात राहायला आहेत. दिल्लीतील ‘टेलीकाॅम डिपार्टमेट ऑफ इंडिया’च्या कार्यालयातून बोलत असल्याची बतावणी चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाकडे केली होती. काळ्या पैशांच्या व्यवहारात मोबाइल क्रमांकाचा वापर झाल्याची भीती सायबर चोरट्यांनी त्यांना दाखविली.

याप्रकरणात अटक करण्याची भीती दाखवून त्यांना तातडीने पैसे जमा करण्यास सांगितले. चोरट्यांच्या खात्यात ज्येष्ठाने वेळोवेळी २३ लाख रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर तपास करत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई करण्यात येणार असल्याची भीती दाखवून फसवणूक करण्याचे प्रकार गेल्या काही महिन्यांपासून वाढीस लागले आहेत.