विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केलीय. तसेच पुणे महानगरपालिकेच्या कामाचं कौतुक केलंय. यावेळी त्यांनी सध्या नेते आणि नोकरशाहा जिल्ह्याजिल्ह्यामध्ये खंडणीचं काम करत आहेत, असा गंभीर आरोप केला. ते पुणे शहर भाजपाच्या नवीन इमारतीतील मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आज नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देश पुढे जातोय, तर दुसरीकडे महाराष्ट्रात वसुली हा एकमेव धंदा आहे. वसुलीशिवाय काहीच होत नाही. भ्रष्टाचार प्रचंड बोकाळला आहे. इथली नोकरशाही संपुष्टात येत आहे. महाराष्ट्राच्या नोकरशाहीला देशातील सर्वोत्तम नोकरशाही म्हटलं जायचं. त्या नोकरशाहीला राजकीय नेत्यांच्या भ्रष्टाचाराने पोखरून टाकलं. आता नेते आणि नोकरशाहा जिल्ह्याजिल्ह्यामध्ये खंडणीचं काम करत आहेत आणि सामान्य माणसाचा विचार करायला कुणी तयार नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात वसुली सुरू आहे.”

“कोविड काळात राज्य सरकार कुठे होतं?”

“कोविडच्या काळात पुण्यात आमच्या महानगरपालिकेने पुणेकरांकरता रस्त्यांवर येऊन काम केलं. सामान्य पुणेकरासाठी आमची महानगरपालिका जागरूक होती. त्याचवेळी राज्य सरकार कुठे होतं? राज्य सरकारने काय मदत केली. राज्य सरकारने कोविडसाठी पुणे महानगरपालिकेला कोविडकरता एक नव्या पैशाचं अनुदान दिलं नाही. असं असताना आमच्या महानगरपालिकेने सांगितलं आम्ही जनतेला उत्तरदायी आहोत. या काळात महापौरांसह आमचे सर्व पदाधिकारी जनतेसाठी रस्त्यावर होते,” असं फडणवीस यांनी सांगितलं.

हेही वाचा : देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र; म्हणाले, “एका महत्त्वाच्या विषयाकडे…”!

फडणवीस म्हणाले, “मोदींनी आवाहन केलं होतं एकही माणूस उपाशी झोपला नाही पाहिजे. त्या सर्वांपर्यंत भाजपाचे कार्यकर्ते शिधा पोहचवण्याचं काम करत होते. भाजपा केवळ निवडणुका जिंकण्याचं यंत्र नाही, तर सेवेचं एक संघटन आहे असं आमचे नेते मोदींनी सांगितलं होतं. सेवेच्या माध्यमातून देश उभा करण्यासाठी हा पक्ष तयार झाला. जगाच्या पाठीवरचा सर्वात मोठा पक्ष म्हणून आज भाजपाला मान्यता मिळाली आहे.”

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis criticize mva government over pune covid situation extortion allegation pbs
First published on: 03-12-2021 at 21:25 IST