पुणे : भारतात नागरी उड्डाण क्षेत्रात चांगली संधी असून, भविष्यात हेलिकाॅप्टर आणि लघु-विमानांसाठी नागरी हवाई महासंचालनालयाअंतर्गत ‘स्वतंत्र संचालनालय’ स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री किंजारापू राममोहन नायडू यांनी येथे केली.
नागरी उड्डाण मंत्रालयाच्या वतीने महाराष्ट्र राज्य सरकार, पवन हंस आणि फिक्की यांच्या सहकार्याने हेलिकॉप्टर आणि लघुविमानांसंदर्भात सातवी परिषद नायडू यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात पार पडली. या वेळी नायडू यांनी स्वतंत्र संचालनालयाची घोषणा केली.
केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, ‘डीजीसीए’चे महासंचालक फैज अहमद किडवाई, भारतीय विमानतळ प्राधिकरण, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) या विभागातील अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते.
नायडू म्हणाले, ‘पुढील दशकात नागरी हवाई उड्डाण क्षेत्राचे महत्त्व आणखी वाढणार आहे. त्यामुळे हवाई क्षेत्रातील दळणवळण सुविधा आणखी वाढविण्यासाठी व्यवस्थेत हेलिकॉप्टर आणि लघुविमानांच्या उड्डाणांना चालना देण्याचे नियोजन आहे. ‘डीजीसीए’अंतर्गत स्वतंत्र संचालनालय स्थापन करण्यात येईल. या संचालनालयामार्फत हेलिकॉप्टरविषयक सुरक्षितता, प्रमाणीकरण आणि प्रक्रियात्मक मदतीसाठी एकाच खिडकीतून सुविधा दिल्या जाणार आहे.’
मोहोळ म्हणाले, ‘आम्ही हवाई वाहतूक प्रणालीचे आधुनिकीकरण, हरित इंधनाचा प्रसार आणि भविष्यातील विमाननांच्या सुरक्षिततेसंदर्भात अभ्यास करीत आहोत. याचा लवकरच धोरणांमध्ये समावेश करण्याचे नियोजन आहे. विमान वाहतुकीतील स्वयंपूर्णतेसाठी डोंगराळ आणि दुर्गम भागांमध्ये सुलभ हवाई सेवा सुरू करून विशेषत: रुग्णवाहिकेच्या माध्यमातून ही सेवा उपलब्ध व्हावी, हे आमचे ध्येय आहे.’
यावेळी डीजीसीए सुरक्षांतर्गत नियमावली, भांडवली वित्तपुरवठा आणि भाडेतत्त्वांवरील संधी, निर्माते व सेवा देणाऱ्यांच्या अडचणी, राज्य सरकारचे उद्दिष्ट, उद्योगातील नवीन तंत्रज्ञानाचा समावेश, निर्मितीक्षमता आणि वित्तीय चौकटी अशा वेगवेगळ्या विषयांवरील चर्चासत्रे पार पडली.