जेजुरी : श्री संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा दिवे घाट पार करून रविवारी सासवड येथे दोन दिवसांच्या मुक्कामासाठी येणार असून, संत सोपानदेव यांचा पालखी सोहळा सोमवारी (२३ जून) पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे.संत सोपानदेव देवस्थान ट्रस्टच्या वतीने पालखी प्रस्थान सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे.सोमवारी सकाळी ११ वाजता टाळ-मृदुंगाच्या निनादात पालखी सोहळा प्रस्थान ठेवणार आहे. यंदा सोहळ्यामध्ये ११३ दिंड्या असल्याची माहिती देवस्थानचे मुख्य विश्वस्त ॲड. त्रिगुण गोसावी यांनी दिली.

‘द्वादशीला प्रस्थानाच्या अगोदर देवस्थानाच्या वतीने पादुकांची महापूजा होईल. पादुकांना औक्षण झाल्यानंतर परंपरेप्रमाणे संत सोपान देवांच्या पादुका गोसावी मंडळी केंजळे यांच्या हाती सुपूर्द करतील. त्यानंतर या पादुका पालखीत नेऊन ठेवल्या जातील. त्यानंतर पालखी सोहळा पंढरपूरला जाण्यासाठी प्रस्थान ठेवणार आहे,’ अशी माहिती श्रीकांत गोसावी यांनी दिली. पालखी सोहळा पिंपळे, पांगारे, मांडकी, निरा, निंबूत, सोमेश्वर करंजे पूल, वडगाव निंबाळकर, माळेगाव, बारामती, भवानीनगर, अकलूज या मार्गे जाणार असून, चार जुलै रोजी वाखरी येथे उभे रिंगण झाल्यावर पाच जुलैला सोहळा पंढरपूरला पोहोचणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मानाचा अश्व सासवडमध्ये दाखल

पालखी सोहळ्यासाठी अंजनगाव (ता. बारामती ) येथील अजित परकाळे यांचा मानाचा अश्व सासवडला दाखल झाला आहे. या अश्वाचे पूजन करण्यात आले. रथाच्या बैलजोडीचा मान सोरटेवाडी येथील केंजळे परिवाराकडे, तर नगारा वाजवणाऱ्या बैलगाडीच्या बैलांचा मान निरा येथील कुलकर्णी परिवाराचा आहे.