महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी डोळ्यात तेल घालून काम करावे. महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी पोलिसांनी प्रभावीपणे काम केले पाहिजे. महिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा करता कामा नये, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या समारोपप्रसंगी देशभरातील पोलीस महासंचालकांना दिल्या. पोलिसांवरील कामाचा ताण वाढत आहे. अशा परिस्थितीत काम करताना पोलिसांनी समाजातील शेवटचा घटक विचारात ठेवून कर्तव्य पार पाडावे, असेही ते म्हणाले.
पाषाण रस्त्यावरील ‘आयसर’(भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था) संस्थेच्या आवारात ‘देशांतर्गत सुरक्षा’ या विषयावरील या तीन दिवसीय परिषदेचा समारोप करण्यात आला. समारोप सत्रात पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी आणि नित्यानंद राय या वेळी उपस्थित होते. या परिषदेत देशभरातील १८० पोलीस महासंचालक सहभागी झाले होते.
देशातील कायदा-सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलीस दलाची प्रशंसा मोदी यांनी या वेळी केली. पोलिसांचे कामाचे स्वरूप तसेच कामाच्या वेळा निश्चित नसतात. अशा परिस्थितीत पोलिसांवर ताण वाढतो. कामाचा ताण, नागरिकांशी होणारा संवाद या सर्व गोष्टी विचारात ठेवून पोलिसांनी आपण समाजासाठी तसेच तळागळातील नागरिकांसाठी काम करत आहोत याची जाणीव ठेवावी, असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, ‘ईशान्य भारतातील राज्यांतील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे. या भागांत शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. या भागांत देशविरोधी कारवाया रोखण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. तेथे शांतता प्रस्थापित झाल्यानंतर तेथील विकासाचा वेग वाढेल. देशांतर्गत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन सुरक्षेच्या बाबतीत तडजोड करू नये. तंत्रज्ञानातील नवनवीन बदल स्वीकारून पोलीस दलाने देशांतर्गत घडामोडी तसेच गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्य़ांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करावेत.’
पोलीस आयुक्तांची दिलगिरी
गेले तीन दिवस शहरात राष्ट्रीय सुरक्षा परिषदेसाठी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा मुक्काम होता. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठय़ा प्रमाणावर बदल करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागला. पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी रविवारी रात्री ट्वीट करून याबाबत दिलगिरी व्यक्त केली.
मोदी-शौरी भेट : भारतीय जनता पक्षाचे नेते आणि ज्येष्ठ पत्रकार अरुण शौरी यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रुबी हॉल क्लिनिकच्या अतिदक्षता विभागाला भेट दिली. मागील आठवडय़ाभरापासून शौरी येथे उपचारांसाठी दाखल आहेत. रुग्णालयाच्या अति दक्षता विभागाच्या प्रमुख डॉ. प्राची साठे यांनी ‘लोकसत्ता’ला याबाबत माहिती दिली. पंधरा मिनिटे पंतप्रधान मोदी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात होते. शौरी यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती नरेंद्र मोदी यांनी घेतल्याचे त्यांनी सांगितले.