लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे राज्यातील पहिली ते बारावीच्या सर्व माध्यम आणि शिक्षण मंडळांच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळांना आवश्यकतेनुसार सुटी जाहीर करण्याचा निर्णय घेण्याचे निर्देश शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

राज्यातील रायगड, ठाणे, पालघर, चंद्रपूर, कोल्हापूर, रत्नागिरी अशा काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्याशिवाय राज्यात रेड आणि यलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. पुणे, सातारा, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा अशा काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

आणखी वाचा-कोथरुड ‌भागातून अटक केलेल्या दहशतवाद्यांकडे ड्रोन कॅमेऱ्याचे साहित्य, बनावट आधारकार्ड जप्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पार्श्वभूमीवर विद्यार्थी सुरक्षेसाठी शाळा बंद ठेवण्याबाबचे निर्देश शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी परिपत्रकाद्वारे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले. अतिवृष्टीमुळे पहिली ते बारावीच्या सर्व माध्यमाच्या, मंडळाच्या विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यात गैरसोय निर्माण होऊ शकते. याचा विचार करता शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शाळांना आवश्यकतेनुसार सुटी जाहीर करण्याचा निर्णय घ्यावा, असे नमूद करण्यात आले.