पुणे : ससून रुग्णालयात काही कर्मचारी एकाच विभागात अनेक वर्षे ठाण मांडून बसले आहेत. अशा कर्मचाऱ्यांकडून हितसंबंध जोपासले जात असतील अथवा गैरप्रकार होत असतील तर त्यांची तेथून बदली केली जाणार आहे, अशी माहिती ससूनचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी शुक्रवारी दिली. याचबरोबर रुग्णालयातील स्वच्छतेवर भर देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठातापदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर डॉ. काळे यांनी ‘लोकसत्ता’शी संवाद साधला. या वेळी त्यांनी रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयासमोरील प्रश्न तातडीने सोडविण्याची भूमिका मांडली. याचबरोबर रुग्णसेवा प्रभावी करणे आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा करणे या दोन गोष्टी प्राधान्यक्रमावर राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आणखी वाचा-पुण्यात ‘सीएनजी’ टंचाई! पंप रोज सहा तास बंद; वाहनचालकांचे हाल
मागील काही काळात ससूनमध्ये एकाच विभागात अनेक कर्मचारी वर्षानुवर्षे ठाण मांडून बसले आहेत. हे कर्मचारी गैरप्रकार करीत असल्याचे उघडकीस आले आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना डॉ. काळे म्हणाले की, अनेक कर्मचारी हे प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने एकाच विभागात अनेक वर्षे कार्यरत असतात. असे कर्मचारी हितसंबंध जपत असतील अथवा गैरप्रकार करीत असतील तर त्यांना शोधून त्यांची बदली केली जाईल. व्यवस्थेचा गैरफायदा कोणीही घेऊ नये, यासाठी प्रशासकीय पावले उचलली जातील.
आणखी वाचा-सुषमा अंधारेंना नाशिकहून निनावी पत्र; पत्रात ललित पाटील प्रकरणाची धक्कादायक माहिती असल्याचा दावा
रस्ते चकाचक करणार
ससून रुग्णालयाच्या आवारातील रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे रुग्णालयाची प्रतिमा खराब होत आहे. हे रस्ते चांगल्या दर्जाचे केले जाणार आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाशी चर्चा झालेली आहे. पुढील आठवड्यात बैठक घेऊन हे काम मार्गी लावणार आहे, असे डॉ. काळे यांनी सांगितले.
ससूनच्या बाह्यरूग्ण विभागाचे नूतनीकरण सध्या सुरू आहे. यामुळे रुग्णांची काही प्रमाणात गैरसोय होत आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागासोबत पुढील आठवड्यात बैठक घेतली जाईल. -डॉ. विनायक काळे, अधिष्ठाता, ससून रुग्णालय