पुणे : अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमात वाढलेले अभ्यासक्रम, मिळणारी रोजगारसंधी, उच्च शिक्षणाचा पर्याय अशा कारणांमुळे विद्यार्थ्यांचा अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाकडे ओढा वाढला आहे. त्यामुळे अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये वाढ होत असून, यंदा पदविका अभ्यासक्रमाला पुणे विभागातील तंत्रनिकेतनांमध्ये सुमारे ४२ हजार जागा उपलब्ध होणार आहेत.
‘दहावीनंतर पदविका अभ्यासक्रमात आता संगणक, माहिती तंत्रज्ञान, मशिन लर्निंग, कृत्रिम बुद्धिमत्ता असे अभ्यासक्रम उपलब्ध झाले आहेत. नव्या शाखांमुळे विद्यार्थ्यांचा पदविका अभ्यासक्रमाकडे ओढा वाढतो आहे. तसेच, राष्ट्रीय शिक्षण धोरणात विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासावर भर देण्यात आला आहे. पदविका अभ्यासक्रमानंतर पदवीच्या थेट द्वितीय वर्षाला प्रवेश मिळतो. तसेच, बारावीनंतर पदविका अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षाला प्रवेश मिळतो. त्यामुळे बारावीनंतर सुमारे १० टक्के विद्यार्थी पदविका अभ्यासक्रमाकडे वळतात,’ अशी माहिती शासकीय तंत्रनिकेतन, पुणेचे प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील यांनी दिली.
‘तंत्रशिक्षण संचालनालयाच्या पुणे विभागांतर्गत पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे राज्यभरात पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. दहावी आणि बारावीनंतर विद्यार्थ्यांना पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. पुणे विभागात २०२३मध्ये ११० संस्थांमध्ये ३४ हजार ८०५, तर २०२४मध्ये ११६ संस्थांमध्ये ३९ हजार ६२० जागा उपलब्ध होत्या. यंदाही जागांमध्ये वाढ होऊन २०२५मध्ये १२० संस्थांमध्ये ४१ हजार ७९३ जागा प्रवेशासाठी उपलब्ध होणार आहेत,’ असे पुणे विभागीय सहसंचालक डॉ. डी. व्ही. जाधव यांनी सांगितले.
डॉ. जाधव म्हणाले, ‘पदविका अभ्यासक्रमाच्या जागांची प्रक्रिया अद्यापही सुरू आहे. त्यामुळे सुमारे ४२ हजार जागा प्रवेशासाठी उपलब्ध होऊ शकतात. मुलींसाठी मोफत शिक्षणाच्या राज्य सरकारच्या योजनेमुळे पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशांत मुलींचा टक्काही वाढत आहे. तसेच, पदविका अभ्यासक्रमानंतर विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंट मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा ओढा वाढतो आहे. गेल्या वर्षी पदविका अभ्यासक्रमाच्या १० ते १२ टक्के जागा रिक्त राहिल्या होत्या. त्यातील बहुतांश जागा ग्रामीण भागातील होत्या.’
पदविका अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना रोजगारसंधी मिळतात. पुणे शासकीय तंत्रनिकेतनातील विद्यार्थ्यांना ८ लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज मिळते. पदविका अभ्यासक्रमाचे सुमारे १० टक्के विद्यार्थी नोकरी, नवउद्यमी, स्वयंरोजगाराकडे वळतात, तर ९० टक्के विद्यार्थी पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात. – डॉ. राजेंद्र पाटील, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन पुणे.