लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात डोळे येण्याच्या साथीचा उद्रेक झाला आहे. गेल्या बारा दिवसांत शहरातील २ हजार ७२३ जणांना प्रादुर्भाव झाला असून, त्यात शाळकरी मुलांचे प्रमाण अधिक आहे. दररोज तीनशेहून अधिक जणांना लागण होत आहे. बुधवारी दिवसभरात ४३७ जणांना प्रादुर्भाव झाला आहे.
वातावरण बदलामुळे डोळे येण्याची साथ आली आहे. सुरुवातीला आळंदीत साथ आली होती. त्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्येही या साथीचा प्रादुर्भाव दिसू लागला. डोळ्यांचा विषाणू संसर्ग हा मुख्यत्वे ॲडिनो विषाणूमुळे होतो. महापालिकेने २० जुलैपासून डोळे लागण होणाऱ्या रुग्णांची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली. त्यानुसार गेल्या १२ दिवसांत २ हजार ७२३ जणांना प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आले. लागण झालेल्या रुग्णांपैकी एकाही जणाला रुग्णालयात दाखल करावे लागले नाही. आतापर्यंत लागण झालेल्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण शालेय विद्यार्थ्यांचे आहे. त्यामुळे महापालिकेचे वैद्यकीय पथक शाळेत जाऊन मुलांची तपासणी करत आहे.
आणखी वाचा-पिंपरी-चिंचवडकरांची पाण्याची चिंता मिटली; पवनाधरण ९२ टक्के भरले
डोळे आलेल्या व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे. डोळ्याला वारंवार हात लावू नये. नियमित हात धुवावेत. एकापासून दुसऱ्या व्यक्तीला हा संसर्ग वेगाने होतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेणे आवश्यक आहे. आजार पसरू नये, यासाठी कपडे, टॉवेल आणि चादरी स्वतंत्र ठेवाव्यात. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये लक्षणे आढळल्यास त्यांना शाळेत पाठवू नये, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले.
डोळे येण्याच्या साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव शालेय विद्यार्थ्यांमध्ये जास्त आहे. शाळेतील पाचपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना लागण झाली असल्यास त्याबाबत वैद्यकीय विभागाला माहिती देण्याच्या सूचना शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्राद्वारे दिल्या आहेत. शाळेने तपासणीसाठी बोलवल्यास वैद्यकीय विभागाचा चमू शाळेत जाऊन विद्यार्थ्यांची तपासणी करत आहे. सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या भागाचे सर्वेक्षण केले जात आहे. सर्व रुग्णालयांसह मासुळकर कॉलनीतील डोळ्यांच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत एकही रुग्ण रुग्णालयात दाखल झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये. -डॉ. अभयचंद्र दादेवार, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका