पुणे : महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कार्पोरेशन (महामेट्रो) पुणे आणि नागपूर मेट्रो प्रकल्पांना चालना देण्यासाठी युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक (इआयबी) विकास शाखेने सुमारे २,५०० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. त्यानुसार सर्वाधिक नागपूर मेट्रोसाठी २,४६१ कोटी रुपयांचे कर्ज म्हणून, तर पुणे मेट्रोसाठी ५०८ कोटी रुपये अतिरिक्त कर्ज म्हणून हा अर्थपुरवठा होणार आहे. त्यामुळे दोन्ही शहरातील मेट्रो विकासाला चालना मिळणार आहे.
भारतातील शाश्वत शहरी वाहतूक व्यवस्था बळकटी देण्यासाठी आणि हरित, सुरक्षित, समावेशक प्रवासाला चालना मिळावी म्हणून ‘इआयबी’ कडून निधी देण्यात येतो. त्यानुसार पुणे आणि नागपूर शहरातील मेट्रोचे जाळे दिवसेंदिवस विस्तारीत आहेत. नव्याने मार्गिकांचा विस्तार होत असून पर्यावरणपूरक विकासाच्या दृष्टीने आणि वाहतूक व्यवस्थ बळकट करण्याच्या दृष्टीने २,९६९ कोटी रुपयांचा कर्जपुरवठा जाहीर केला आहे. दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो मार्गिका विस्तारासाठी या निधीचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
पुणे मेट्रोच्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये वनाझ ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी, स्वारगेट ते कात्रज भूयारी मार्ग, शिवाजीनगर ते कोंढवा, पिंपरी ते चाकण. या मार्गांचा विस्तार प्रस्तावित आहे. केंद्र सरकारने नुकतीच वनाज ते चांदणी चौक रामवाडी-वाघोली प्रकल्पासाठी ३,६२६ कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे. काही प्रकल्पांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे. केंद्र आणि राज्यसरकारबरोबर स्थानिक महापालिका यांचे आर्थिक दायित्वानंतरही वित्तीय तूट भरून काढण्यासाठी इआयबी ने पुरवलेल्या वित्तीय पुरवठाचा हातभार लागणार आहे.
नागपूर मेट्रोची सध्याची स्थिती म्हणजे ३८.२ किलोमीटर लांबीच्या ३७ स्थानकांसह कार्यरत आहे. जरी सेवा सुरू असली तरी, मेट्रोला आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागत आहे्. त्यातच भविष्यातील विस्तारासाठी ‘सीताबर्डी-कोराडी कॉरिडॉर’ सारखे नवीन प्रकल्प विस्तारीतकरण तिसऱ्या टप्प्यातील भाग आहेत.
भारत-युरोप गुंतवणुकीला चालना
युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेने आत्तापर्यंत भारतातील वाहतूक क्षेत्रासाठी ३.६ अब्ज युरो म्हणजे ३६ हजार ५०० कोटी रुपयांचा अर्थपुरवठा केला आहे. भारत हा युरोपबाहेरील सर्वांत मोठा भागीदार ठरला असून, १९९३ पासून बँकेने भारतात ५.६ अब्ज युरो म्हणजे ५६ हजार कोटींची गुंतवणूक केली आहे, अशी माहिती ‘इआयबी बँके’च्या उपाध्यक्ष निकोला बीअर यांनी दिली आहे.
पुणे शहराचे होणारे विस्तारीकरण, वाहतूक कोंडी आणि वाढते प्रदूषण यामुळे मेट्रो सारखा सक्षम पर्याय उपलब्ध करून देऊन विस्ताराचे काम सुरू आहे. या कर्जपुरवठ्यामुळे नक्कीच प्रस्तावित प्रकल्पांना चालना मिळेल. – श्रावण हर्डीकर, व्यस्थापकीय संचालक, महामेट्रो