पुणे : शिवाजीनगर येथील करोना काळजी केंद्रातील गैरव्यवहार प्रकरणात संजय राऊत यांचे भागीदार ठेकेदार सुजीत पाटकर यांच्या विरोधात महापालिका आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. पाटकर यांच्या कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात आले होते. तत्कालिन पालकमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या विरुद्ध कारवाई केली नाही. त्यामुळे महापालिका आयुक्त आणि पीएमआरडीए आयुक्तांनी या प्रकरणात पोलिसांकडे तक्रार करावी. अन्यथा मी पोलिसांकडे तक्रार करेल, अशा इशारा भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी गुरुवारी दिला.

सोमय्या यांनी गुरुवारी (३० मार्च) पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची भेट घेतली. भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक या वेळी उपस्थित होते. पुणे महापालिकेत माझ्यावर हल्ला करण्यात आला. या प्रकरणात २८ जणांची ओळख पटलेली आहे. सात आरोपींचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. माझा जीव घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुंडावर कारवाई व्हायला हवी. देशात जीवनावश्यक वस्तुंचे भाव वाढले असल्याचे पत्रकारांनी सोमय्या यांच्या निदर्शनास आणून दिले. त्या वेळी सोमय्या म्हणाले, ‘रशिया-युक्रेन युद्धामुळे दरवाढ झाली आहे.अन्य देशात पेट्रोलचे प्रतिलिटरचे दर २५० रुपयांपुढे गेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणामुळे जीवनावश्यक वस्तुंचे दर स्थिर आहेत.’