पुणे : सदाशिव पेठेतील चिमण्या गणपती चौकात असलेल्या जुन्या वाड्यात रविवारी रात्री आग लागली. वाड्यातील रहिवासी त्वरीत बाहेर पडल्याने अनर्थ टळला. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करुन अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली.
सदाशिव पेठेतील चिमण्या गणपती चौकात चव्हाण वाडा आहे. चिमण्या गणपती चौकात कपड्यांची दुकाने आहे. दिवाळीनिमित्त कपड्यांच्या दुकानात खरेदीसाठी गर्दी झाली होती. रात्री आठच्या सुमारास वाड्याच्या छतावरील पालपाचोळ्याने पेट घेतला. छत पेटल्यानंतर रहिवासी बाहेर पळाले. काही क्षणात आग भडकली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे चार बंब आणि टँकर घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशमन दलाचे केंद्र प्रमुख संजय रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली उमेश शिंदे, संदीप घडशी, श्रीकांत बंड, निरंजन घोरपडे, सागर देवकुळे यांनी पाण्याचा मारा करून अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. आगीत वाड्यातील काही भागाचे नुकसान झाले.
वाड्यात चार कुटुंबे राहायला आहेत. रहिवासी बाहेर पडल्याने गंभीर दुर्घटना टळली. आगीमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. जुन्या वाड्याच्या छतावर पेटता फटाका पडल्याने आग लागल्याची शक्यता अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख संजय रामटेके यांनी व्यक्त केली.